‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार’

केंद्र सरकारला जाहिरातींवर केलेला १३ हजार कोटी रुपयांचा खर्च टाळून शेतकऱ्यांना कर्जमाफी देता आली असती.

केंद्र सरकारला जाहिरातींवर केलेला १३ हजार कोटी रुपयांचा खर्च टाळून शेतकऱ्यांना कर्जमाफी देता आली असती. मात्र, सरकारने दोन वर्षांत राज्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या ३ हजार आत्महत्यांकडे दुर्लक्ष केले, असा आरोप करुन यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार असल्याचा ठराव कार्यकर्त्यांच्या बठकीत घेण्यात आला आहे. पक्षाचे निरीक्षक माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर यांनी ही माहिती दिली. येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर निरीक्षक कव्हेकर यांनी पत्रकार बठक घेऊन पक्षाची भूमिका मांडली. या वेळी जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी मंत्री सुरेश नवले, माजी आमदार सिराज देशमुख, रवींद्र दळवी, दिलीप भोसले, महादेव धांडे आदी उपस्थित होते. कव्हेकर म्हणाले की, कार्यकर्त्यांच्या बठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढाण्याची मागणी झाल्यानंतर एकमताने ठराव घेण्यात आला. पक्ष संघटना बांधणी, तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकदिलाने काम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गेल्या दोन वर्षांत राज्यात ३ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पकी मराठवाडय़ात २ हजार आत्महत्या असून सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यात आहेत. सरकारकडे सातत्याने संपूर्ण कर्जमाफीची मागणी होत असताना त्याकडे दुर्लक्ष केले गेले.
देशातील दहा उद्योगपतींनी दहा लाख कोटी बुडवले. याशिवाय २९ कंपन्यांना १ लाख १४ हजार कोटींचे कर्ज सरकारने माफ केले. मात्र, लोकसभा निवडणुकीपूर्वी स्वामिनाथन आयोग स्वीकारुन उत्पादन खर्चावर अधिक ५० टक्के नफा असा शेतीमालाला भाव देण्याचे आश्वासन सरकार विसरले. नवीन रोजगार उपलब्ध करण्याऐवजी या सरकारच्या काळात दोन कोटी लोकांचे रोजगार गेले. इंधनाचे भाव गडगडल्याने सरकारची साडेसात लाख कोटींची बचत झाली, तरीही सरकार शेतकऱ्यांसाठी मदत करायला तयार नाही. उलट जीवनावश्यक वस्तूंमधून ४०० औषधांना वगळल्याने या औषधांच्या किंमती बाजारात भडकल्या आहेत. सरकारने जाहिरातींवर केलेला तेरा हजार कोटी रुपयांचा खर्च टाळून शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे आवश्यक होते, असा आरोपही त्यांनी केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Congress to contest alone in local body elections