औरंगाबाद: राज्य सरकारला काम करू द्यायचे नाही. नेत्यांच्या मागे अंमलबजावणी संचालनालयाचे किंवा केंद्रीय अन्वेषण गुन्हा विभागाचे अधिकारी लावून द्यायचे. आता तर राज्यात दंगली घडविण्याचे कारस्थान घडविले जात असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. औरंगाबाद येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित महागाई विरोधातील आक्रोश मेळाव्यात ते बोलत होते.

  इंधन दरवाढ तर झालीच झाली पण आता काडीची पेटीसुद्धा महागली आहे. पूर्वी स्मृती इराणी गॅसची टाकी घेऊन रस्त्यावर दिसायच्या. आता त्या पुन्हा रस्त्यावर उतरल्या तर रिकाम्या टाक्या त्यांना आम्ही पुरवू, असे म्हणत राऊत यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली. वाढती महागाई लादली जात आहे. ज्या प्रकारे हे काम सरकार करत आहे ती एक प्रकारची निजामशाहीच असल्याचेही टीका राऊत यांनी केली. खरे तर महागाई आणि बेरोजगारी या दोन महत्त्वपूर्ण समस्या आहेत. पण त्यापेक्षाही भारत-पाकिस्तान, सर्जिकल स्ट्राईक, चीनची घुसखोरी असे मुद्दे चर्चेत आणले जातात. सामांन्याच्या प्रश्नावर भाजपचे नेते बोलत नाहीत. आता तर दंगली पेटवायचं कारस्थान सुरू झाले आहे. राज्य सरकार विरोधात रोष वाढला की राष्ट्रपती राजवट लावणे सोपे होईल अशी व्यूहरचना केली जात आहे. पण अशा सर्वांना आक्रोश मोर्चा  हे उत्तर आहे असे सांगत त्यांनी केंद्र सरकारावर टीका केली.  औरंगाबाद येथील क्रांतीचौक ते गुलमंडी दरम्यान निघालेल्या मोर्चात मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. या वेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे याची भाषणे झाली. कार्यक्रमाचे आयोजन आमदार व शिवसेना जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांनी केले. आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार रमेश बोरनारे, उदर्यंसह राजपूत यांची उपस्थिती होती.