बंडखोरांच्या मतदारसंघांत सेनेकडून बांधणी; कोंडी करण्यासाठी निधीचे आकडेही जाहीर करण्याची व्यूहरचना

शिवसेनेतील बंडाळीबाबत न्यायालयीन लढाई सुरू असताना बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात बांधणीसाठी आता शिवसेनेकडून मेळावे घेतले जात आहेत.

shivsena-flag
शिवसेना पक्षध्वज (संग्रहित छायाचित्र)

औरंगाबाद: शिवसेनेतील बंडाळीबाबत न्यायालयीन लढाई सुरू असताना बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात बांधणीसाठी आता शिवसेनेकडून मेळावे घेतले जात आहेत. या मेळाव्यातून ‘बंडखोर’ आमदारांना दिलेला निधी, त्यांनी पक्षाविरोधात केलेले बंड याची माहिती देताना स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांची संख्या दाखविण्यावर शिवसेनेकडून भर देण्यात येत आहे. बंडखोर आमदार रमेश बोरनारे यांच्या वैजापूर मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी सोमवारी मोठी गर्दी केली होती. या वेळी विधान परिषद निवडणुकीत मतदान करताना त्यांनी आर्थिक व्यवहार केल्याचाही आरोप शिवसैनिकांनी केला.

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण मतदारसंघाचे आमदार व रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सतार यांच्यासह आमदार संजय शिरसाठ, प्रदीप जैस्वाल यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडात सहभाग नोंदवल्यानंतर शिवसैनिक चिडले असले तरी विधिमंडळातील बहुमताचा आकडा गाठता यावा म्हणून बंडखोरांना शिवसेनेचे नेते ‘ गद्दार’ म्हणत नाहीत. त्यामुळे आक्रमक शिवसेनेचे हात दगडाखाली असल्याचे चित्र औरंगाबादमध्ये  दिसून येत आहे. फलकांवरील बंडखोर नेत्यांच्या छायाचित्रास काळे फासणे, फलक फाडणे असे प्रकार गावोगावी सुरू आहेत. रमेश बोरनारे व शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यातील दूरध्वनी संवाद वृत्तवाहिनीच्या थेट प्रक्षेपणामुळे सर्वसामांन्यापर्यंत पोहचल्यानंतर गुवाहाटीमध्ये असणाऱ्या आमदारांची मानसिकता ढळत असल्याचे निष्कर्ष शिवसेनेकडून सांगण्यात येत आहेत. औरंगाबाद शहरातील पश्चिम व मध्य मतदारसंघातील मेळाव्यातही शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना दिलेली पदे, त्यांचा केलेला मानसन्मान विसणाऱ्या नेत्यांचा इतिहास आवर्जून सांगण्यात येत आहे. मात्र, असे करताना संघटनेतील सर्व पदाधिकारी या बंडखोर आमदारांबरोबर नाहीत, हेही विभागीय मेळाव्यातून दाखविले जात आहे. शिवसैनिकांमध्ये दोन गट पडू नयेत याची काळजी घेतली जात असली तरी सिल्लोड मतदारसंघात त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर महसूल राज्यमंत्री सत्तार यांनी सेनेतील संघटनात्मक पदावरही आपल्याच समर्थकांची वर्णी लावून घेतली होती. त्यामुळे सिल्लोड मतदारसंघात शिवसेनेत उभी फूट असल्याचे सांगण्यात येत आहे. नुकतेच या मतदारसंघात सत्तार समर्थकांनी शक्तिप्रदर्शनही केले. जिल्ह्यातील तीन मतदारसंघात शिवसेना

संघटन बंडखोर आमदारांबरोबर नाही असे दिसून येत असले तरी सिल्लोडमधील वेगळे असल्याचा दावा सत्तार समर्थक करीत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात संघटनात्मक बांधणीसाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व आमदार अंबादास दानवे यांनी आता खासे प्रयत्न करायला सुरुवात केली आहे. गेले काही दिवस त्यांच्यात बऱ्याच कुरबुरी सुरू होत्या. मात्र, आता ते दोघेही एकत्रपणे विभागीय मेळाव्यांना हजेरी लावत आहेत. औरंगाबादवगळता मराठवाडय़ातील बंडखोर समर्थकांचे शक्तिप्रदर्शन मोठय़ा प्रमाणात घडवून आणले जात आहे. सोमवारी उस्मानाबाद येथे तानाजी सावंत यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. बीडमध्ये तर काही कार्यकर्त्यांनी ‘ एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देत तानाजी सावंतांच्या बाजूने आम्ही उभे असल्याचे सांगितले.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Construction sena rebel constituencies strategies disclosing fund figures conundrums ysh

Next Story
“मुख्यमंत्र्यांना बडव्यांनी घेरले”; बंडखोर आमदार शिरसाठांच्या आरोपावर अंबादास दानवेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…
फोटो गॅलरी