राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल असं वादग्रस्त वक्तव्य केलं. यावर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेत निषेध नोंदवला आहे. तसेच सोमवारी (२८ फेब्रुवारी) पुण्यात आंदोलनाची घोषणा केली. त्यामुळे नव्या वादाला सुरुवात झाली आहे. भगतसिंह कोश्यारी औरंगाबाद दौऱ्यावर असताना बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भगतसिंह कोश्यारी म्हणाले, “महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले. चाणाक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे आईचं मोठं योगदान असतं, तसंच आपल्या समाजात गुरूचं मोठं स्थान असतं. शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटलं की तुमच्या कृपेने मला राज्य मिळालं आहे.”

“शिवाजी महाराजांनी गुरुदक्षिणा म्हणून समर्थांना राज्याची चावी देऊ केली”

“आता या देशाची परंपरा आहे, गुरू आहे तर त्याला गुरुदक्षिणा द्यावी लागते. त्यामुळे मी जिंकलोय, राज्याची स्थापना देखील झाली आणि मी रायगडावर आलो आहे. आता गुरुदक्षिणा म्हणून या राज्याची चावी तुम्हाला देतो, असं शिवाजी महाराज समर्थांना म्हटले, पण समर्थांनी ती चावी घेतली नाही. समर्थांनी शिवाजी महाराजांना ते या राज्याचे विश्वस्त असल्याचं सांगितलं. हा भाव अशा सदगुरूकडे मिळतो,” असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले.

“समर्थांच्या स्वप्नातील समाजाची कल्पना प्रत्यक्षात आणली पाहिजे”

“मराठी साहित्यात संत ज्ञानेश्वरांपासून समर्थ आणि आजपर्यंत अनेक लोकांनी आपल्या परीने योगदान दिलं आहे. आपण मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करत आहोत. समर्थांच्या साहित्याबद्दल आज दिवसभरात भरपूर चर्चा झाली असेल. यानंतर आपल्याला नक्कीच असं वाटलं असेल की समर्थांचा जो भारत, समर्थांच्या स्वप्नातील समाजाची कल्पना प्रत्यक्षात आणली पाहिजे,” असंही यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी नमूद केलं.

हेही वाचा : “सावित्रीबाईंचा प्लेगमध्ये काम करताना मृत्यू झाला, पण आज पतीला करोना झाला, तर पत्नी… : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध करत आंदोलनाचा इशारा

पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याला आक्षेप घेत निषेध नोंदवला आहे. तसेच ट्वीट करत आंदोलनाची घोषणा केली आहे. प्रशांत जगताप म्हणाले, “अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सोमवारी (२८ फेब्रुवारी २०२२) सकाळी १०.३० वाजता पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन करण्यात येईल.”

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Controversial statement of governor bhagat singh koshyari on chhatrapati shivaji maharaj pbs
First published on: 27-02-2022 at 23:18 IST