छत्रपती संभाजीनगर – कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या विरुद्ध दिलेल्या अर्जाचा निकाल बाजूने दिल्याच्या बदल्यात मोबदला म्हणून ५० हजारांची मागणी करून तडजोडीअंती २५ हजार रुपये स्वीकारताना अंबाजोगाई येथील सहायक निबंधक सहकारी संस्थेतील श्रेणी-१ चे सहकारी अधिकारी संतोष बद्रीनारायण भंडारी (वय ५०) यांस जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी रात्री पकडले. या प्रकरणी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात भंडारींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष भंडारी यांच्याकडील अंगझडतीत लाच घेतलेले २५ हजार, इतर ८ हजार ५२० रुपये, एक मोबाईल फोन, दोन पिवळ्या धातूच्या अंगठ्या व गळ्यातील साखळी मिळाल्याची माहितीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली.

या प्रकरणातील तक्रारदार हे कै. व्यंकटराव डावळे रुग्णालयीन कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, अंबाजोगाई या संस्थेचे सचिव आहेत. या संस्थेच्या विरुद्ध दिलेल्या अर्जाचा निकाल ७ जानेवारी २०२६ रोजी तक्रारदारांच्या बाजूने लागलेला असून, त्याचा मोबदला म्हणून सहायक निबंधक जयंत पाठक यांना देण्यासाठी सहकार अधिकारी संतोष भंडारी यांनी ३० जानेवारी रोजी ५० हजार रुपयांची मागणी केली. या संदर्भातील लेखी तक्रार २ फेब्रुवारी रोजी जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली. या तक्रारीच्या अनुषंगाने पंचांसमक्ष लाच मागितल्याची पडताळणी केली असता जयंत पाठक यांनी लाचेची मागणी केली नाही.

 परंतु पंच व तक्रारदार हे संतोष भंडारी यांना भेटले असता त्यांनी जयंत पाठक यांच्या नावे ५० हजारांची मागणी करून २५ हजार रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले. त्यावरून जालन्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अंबाजोगाईतील सहायक निबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयात रचलेल्या सापळ्यात भंडारी अडकले. संतोष भंडारीला २५ हजारांच्या लाचेसह जालन्याचे पोलीस उपअधीक्षक बी. एस. जाधवर यांच्या पथकाने ताब्यात घेतले.