छत्रपती संभाजीनगर : तूरडाळ वाढली., तांदूळ वाढले. सिलिंडरच्या किंमती दिवसागणिक वाढते आहे. डिझेल, पेट्राेलमुळे वाहतुकीवर परिणाम होत आहे. याच काळात  तांबे आणि पितळ या दोन्ही धातूंचे भाव वाढल्याने देव्हाऱ्यातील देवांच्या मूर्ती आणि वारीमध्ये ज्यातून ‘नादब्रम्ह’ निर्माण होतो तो टाळदेखील महागला आहे.

धातूंच्या मूर्तीचा बहुतांश व्यापार हा उत्तर प्रदेशातील अलिगडशी निगडीत. धातूंचे दर वाढले आणि वाहतुकीचा खर्च वाढला तसे देव्हाऱ्यातील मूर्तीही ३० टक्क्यांची महागल्या आहेत. पितळाच्या मूर्तीमध्ये प्रति किलो ४५० ते ५०० रुपयांची वाढ झाली आहे. भागवत धर्माची पताका उंचावताना वाजविली जाणारी टाळ ५०० रुपयांपासून ८५० रुपयांपर्यंत झाली आहे. देवांच्या मूर्तीची किंमत वाढविण्याशिवाय पर्याय नाही, असे या क्षेत्रात वर्षानुवर्षे काम करणारी व्यापारी मंडळी सांगत आहेत.

तुळजापूरच्या मंदिरासमोर सचिन नाडापुडे यांचा देव्हाऱ्यातील मूर्ती विक्रीचा व्यवसाय आहे. ते म्हणाले, दरवर्षी देव्हाऱ्यात मूर्ती आणि टाक नेणारे आहेत. देवाची मूर्ती भंगली तर ती विसर्जित करून देव्हाऱ्यात नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. या वर्षी मूर्तीसाठी अधिक रक्कम द्यावी लागत आहे. तांबे – पितळ या दोन्हींच्या दरात ३० ते ३५ टक्के वाढ झाली आहे. ओतकाम करून मूर्ती बनविणाऱ्यांनी त्यांची मजुरी वाढवली आहे. परिणामी टाळही महागले आहेत. पैठणचे वारकरी संप्रदायातील भाविक आणि मूर्ती विक्रेते विठ्ठल खरात म्हणाले, ‘कासेच्या किंमती वाढल्या आहेत.

पूर्वी ५०० रुपयांत मिळणारी टाळची किंमत आता ८५० ते ९०० रुपयांपर्यंत वाढली आहे.’ पैठणहून पांडुरंगाच्या मूर्ती खरेदी करण्याचे प्रमाण अधिक आहे. तर तुळजापूरमधून आराध्य देवतेच्या मूर्ती, झांज अशी खरेदी केली जाते. मृग नक्षत्र लागले की, पेरणीनंतर वारीच्या तयारीला सुरुवात होते. या काळात पखवाजाला शाई लावून घेतली जाते. वारीतील पखवाज वजनाने हलके असतात. त्यांना घेऊन चालता यावे, अशी सोय असते. याच काळात टाळ गळ्यात घालण्यासाठी पट्टे बदलले जातात. नवी मंडळे टाळ विकत घेतात.

अहिल्यानगर येथे याची माेठी बाजारपेठ आहे.  केवळ टाळच नाही तर मृदंगाच्या किंमतीही वाढल्या आहेत. यामुळे या वर्षी वारीचा खर्चही अधिक होणार आहे.  तांबे, पितळ वाढल्याने छोट्या व्यावसायिकांचे भांडवल कमी होत आहे. त्यामुळे तुळजापूर – पंढरपूरसारख्या ठिकाणी मूर्ती विक्री करणाऱ्यांनी दुकानेही बंद केली आहेत.