छत्रपती संभाजीनगर – कापूस आणि सोन्याचे दर अशी तुलना पूर्वी केली जात असे. जेवढा कापूस पांढरा तेवढी किंमत अधिक. पण आता कापूस रंग बदलतोय आणि विशेष म्हणजे तो ‘ सोनेरी ’ झाला आहे.
तेलंगणातील काही शेतकरी गुलाबी, निळ्या-हिरव्या रंगाच्या नव्या वाणातील कापूस उत्पादनाकडे वळल्याचे पाहून आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकत पण सोनेरी कापसाचा प्रयोग छत्रपती संभाजीनगर व जालन्यातील मिळून बारा गावातील सुमारे १५० तरुण शेतकऱ्यांनी केला आहे. शंभर एकरवर पेरणी केलेल्या सोनेरी रंगाच्या कापसाची वेचणी सध्या सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील हात माली, नायगव्हाण, चिंच खोरा, अंजनडोह, सेलूद, औरंगपूर, सय्यदपूर, गंगापूरमधील डोणगाव, वैजापूरमधील थोर वाघलगाव तर जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील कडेगाव, कुसली, असोला व वाल्हा या गावांमधील शेतकऱ्यांनी सोनेरी रंगाच्या कापसाच्या वाणाची पेरणी करून उत्पादन घेतले आहे. या शेतकऱ्यांशी संपर्क साधून आणि शेतामध्येच कार्यशाळा घेऊन कापूस उत्पादनातील नव्या प्रयोगाकडे वळण्याचे आवाहन दुधना हायटेक कृषी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून करण्यात आले. दहा तरुणांनी एकत्र येऊन स्थापन केलेली ही कृषी कंपनी आहे.
या कंपनीचे संचालक संभाजी शेजूळ-पाटील यांनी सांगितले की, गतवर्षीच आम्ही रंगीत कापसाच्या उत्पादनाचा प्रयोगाला सुरुवात केली. साध्या कापसाप्रमाणेच खत, औषध व्यवस्थापन असून, उत्पादकता एकरी काहींना ८ ते १२ तर काहींना १५ क्विंटलपर्यंत झाली आहे. आमच्या कंपनीचा निजीवुडू कंपनीशी करार आहे. निजीवुडू या कंपनीचा एका प्रख्यात शर्ट निर्मित ब्रॅण्डशी करार आहे. त्यामुळे आम्ही उत्पादित केलेल्या रंगीत कापसाची खरेदी होते तीही १० टक्के भाववाढीने.
गतवर्षी हात माली गावामध्ये अवघ्या तीन एकरवर रंगीत कापूस पेरणीचा प्रयोग केला होता. यंदा १०० एकरवर पेरणी केली त्यातील सिद्धता पाहता पुढील वर्षी एक हजार एकरवर क्षेत्रावर पेरणी करण्याचा विचार आहे. – संभाजी शेजूळ-पाटील, संचालक, कंपनी
इको-फ्रेंडली शेती
नैसर्गिक रंगीत कापूस ही भविष्यातील इको-फ्रेंडली शेती आहे. डीडीसीसी-१ किंवा फुले डीसीपी-५१ सारख्या वाणांमुळे रासायनिक रंगांचा खर्च वाचतो आणि कापूस शेती अधिक फायदेशीर व शाश्वत होऊ शकते. छत्रपती संभाजीनगरमध्ये रंगीत कापूस लावल्याची अधिकृत नोंद कृषी विभागाकडे नाही. पण काही शेतकरी असा प्रयोग करत असल्याचे समजते. – विशाल साळवे, नोडल अधिकारी, जिअकृधि कार्यालय.
रंगीत कापसाबाबतची माहिती
डीडीसीसी-१ ही कृषी विज्ञान विद्यापीठ धारवाडने निर्माण केलेली बदामी, फिकट तपकिरी रंगाची ही भारतात ओळखी गेलेली पहिली रंगीत जात. ही जात कोरडवाहू शेती आणि हातमाग कापडासाठी उपयुक्त असल्याचे सांगितले जाते. वैदेही-९५ – ही गडद तपकिरी रंगाचे वाण केंद्रीय कापूस संशोधन संस्था (सीआयसीआर) नागपूरचे. कोकनाडा १ व २ हे लाल, खाकी, तपकिरी रंगाचे वाण असून, याचे पीक आंध्रप्रदेशातील रायलसीमा भागात घेतले जाते. स्वातंत्र्यापूर्वी या कापसाची जपानला निर्यात केली जात असल्याचे सांगितले जाते. राहुरीच्या फुले विद्यापीठानेही डीसीपी-५१ हे रंगीत कापसाचे वाण निर्माण केलेले आहे, असे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांकडून माहिती मिळाली.
