परभणी – शेतकऱ्यांकडील कापूस संपुष्टात आला असताना आणि ‘सीसीआय’नेही कापसाची खरेदी बंद केली असताना दुसरीकडे कापसाच्या दरात लक्षणीय सुधारणा झाली आहे. संपूर्ण हंगामात ७ हजार ते ७५०० रुपये प्रतिक्विंटल या दरावर रेंगाळलेल्या कापसाने आता मात्र खाजगी बाजारात हमीभावावरही कुरघोडी केली आहे. शुक्रवारी (दि.३) सेलू येथे खाजगी बाजारपेठेत कापसाला तब्बल ८४७५ रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला आहे. युद्धजन्य परिस्थितीत पुरवठा साखळीत अडथळा निर्माण झाल्यानेही पांढऱ्या सोन्याला झळाळी आल्याचे मानले जात आहे.

युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर वाढल्याने कृत्रिम धाग्याच्या किमती वाढल्या. परिणामी कापड उद्योगाने कापसाकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. कापसाचे खाजगी बाजारातील दर वाढण्याचे हेही एक कारण मानले जात आहे. विशेष म्हणजे कापसाबरोबरच सरकीच्याही दरात सुधारणा झाली आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा कापसाखालील लागवड क्षेत्र कमी होते.

बाजारातील आवकच कमी असल्याने कापसाचे भाव वाढणार हे अपेक्षित मानले गेले तरीही संपूर्ण हंगामात कापसाला चांगला भाव मिळाला नाही.नेहमीप्रमाणे ‘सीसीआय’ची कापूस खरेदी उशिरा सुरू झाल्याने शेतकऱ्यांना सुरुवातीला खाजगी बाजारातच आपला कापूस आणावा लागला. कापसाचा ८१०० हा हमीभावही शेतकऱ्यांना मिळाला नाही. वाट पाहून शेवटी साडेसात ते ८ हजार रुपये प्रति क्विंटल या दरानेच शेतकऱ्यांनी आपल्याकडील कापूस हंगामाच्या शेवटी घातला.

‘सीसीआय’ची खरेदी १५ मार्चला बंद झाली आहे. तरीही कापसाच्या दरात गेल्या काही दिवसांपासून लक्षणीय सुधारणा झाली. आता कापसाच्या दरात वाढ होत असली तरी शेतकऱ्यांकडे मात्र कापूस शिल्लक राहिलेला नाही. कापसाचे लागवड क्षेत्र कमी असताना आणि सुरुवातीला अतिवृष्टीने पिकावर परिणाम झालेला असतानाही कापसाचे उत्पादन मात्र चांगले झाले आहे. परभणी जिल्ह्यात सेलू, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, बोरी, जिंतूर, पालम, ताडकळस या दहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रात जवळपास ७४ हजार शेतकऱ्यांनी ‘सीसीआय’कडे नोंदणी केली होती.

तब्बल ४६ जिनिंग कारखान्यांमध्ये ९ लाख ६३ हजार ९०७ क्विंटल कापसाची खरेदी झाली. या शेतकऱ्यांना ७७०० सातशे ते ८००० रुपयांपर्यंतचा दर मिळाला. तर परभणी जिल्ह्यात खाजगी व्यापाऱ्यांकडून २६ जिनिंग कारखान्यांमध्ये ८ लाख ५७ हजार ५३३ क्विंटल कापूस खरेदी झाली. सीसीआय आणि खाजगी बाजारपेठ मिळून जिल्ह्यात एकूण १८ लाख २१ हजार ४४० क्विंटल कापसाची खरेदी झाली.

नेहमीपेक्षा मात्र जिल्ह्यात कापसाचे उत्पादन कमी झाले आहे. कोरोना काळात परभणी जिल्ह्याने कापूस उत्पादनात विक्रम प्रस्थापित केला होता. करोनापूर्वीची कापूस खरेदी २६ लाख १० हजार ८८९ क्विंटल तर करोना नंतरची खरेदी १० लाख ६६ हजार ६६० क्विंटल एवढी होती. या तुलनेत यंदाची आकडेवारी मात्र कमी आहे. कोरोना काळात झालेल्या कापसाच्या उत्पादनापेक्षा यंदाचे कापसाचे उत्पादन निम्म्यावर आले आहे.