छत्रपती संभाजीनगर : २०१४ नंतर कापूस उलाढालीतून शेतकऱ्यांना अधिक रक्कम दिली आणि किमान हमी भाव ३ हजार ७०० रुपयांवरून ८ हजार ५०० रुपयांवर नेला, असे केंद्र सरकारचे कौतुक सांगणाऱ्या केंद्रीय कृषी मंत्री गिरिराज सिंग यांना शेतकऱ्यांनी ‘आमचा खर्चही वाढला हो’ असे उत्तर दिले. शनिवारी सीसीआय संस्थेच्या ५६ व्या वर्धापन दिनी हा संवाद घडला. यावर उतारा म्हणून मंत्र्यांनी ८० टक्के सेंद्रीय अणि २० टक्के रासायनिक खते कसे तयार करावे आणि त्यात बेसाल्ट खडकाची भुकटी हा घटक कसा महत्त्वाचा असतो, यावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास अपारंपरिक मंत्री अतुल सावे, समाजकल्याण मंत्री संजय शिरसाठ, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची उपस्थिती होती.

देशातील कापसाच्या उत्पादकतेचे आकडे सांगावेत की न सांगावेत असेच वाटते आहे, असे म्हणत गिरिराज सिंग यांनी देशातील उत्पादकता कशी कमी होत आहे, हे शेतकऱ्यांना सांगितले. ते म्हणाले, चीनमध्ये प्रति हेक्टर २ हजार ३२२ किलो, ब्राझीलमध्ये १ हजार ९५९ किलो, पाकिस्तानात ५७९ आणि भारतात ते केवळ ४३१ किलो एवढे घसरलेले आहे. हे सारे चित्र बदलायचे असेल तर जमिनीची पोषकता वाढवावी लागणार आहे. पुढे जायचे असेल तर उत्पादन खर्च कमी करावा लागेल हे मान्यच आहे, पण पुढील काळात कापसाची घनलागवड हाही उपाय अधिक चांगला आहे. अकोला जिल्ह्यात ३० हजार हेक्टरावर हा प्रयोग करण्यात आला आहे. प्रयोग करणाऱ्या दिलीप ठाकरे शेतकऱ्याचाही त्यांनी उल्लेख केला. कार्यक्रमादरम्यान शेतकरी दिलीप ठाकरे यांच्या प्रयोगाविषयी जाणून घेतले असता ते म्हणाले, एका एकरामध्ये कापसाची साडेपाच पाकिटे वापरल्याने कापूस उत्पादन वाढते, हा प्रयोग वाढवावा लागेल.

देशभर कापूस उत्पादकता वाढावी तसेच कस्तुरी या देशी कापसाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचार व्हावा म्हणून जर्मनीशी या वेळी करारही करण्यात आला. या कराराच्या प्रतीची देवाण घेवाण सीसीआयच्या वर्धापन दिनी करण्यात आली.

देशात पुढील हंगामात ‘ एचटीबीटी ’ चे वाण

देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे म्हणून जैवतंत्रज्ञानाच्या आधारे बियाणे करण्याच्या प्रयोग करण्यात आले. आयसीआर संस्थेकडून त्यास मान्यता मिळते. सध्या ‘एचटीबीटी’चे वाण वापरण्याच्या अनुषंगाने हवामान विभागाची परवानगी मिळणे बाकी आहे. पुढील वर्षीच्या खरीप हंगामापर्यंत हे वाण उपलब्ध होईल, असे गिरिराजसिंग यांनी कार्यक्रमानंतर ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.