छत्रपती संभाजीनगर : शेततळ्यातील पाण्यात बुडून दोन सख्ख्या चुलत भावंडांचा मृत्यू झाल्याची घटना पैठण तालुक्यातील गेवराई बुद्रुक येथील होनोबाची वाडी शिवारात रविवारी दुपारी घडली. सतीश एकनाथ आगळे (वय १८) व गौरव शिवाजी आगळे (वय १६) अशी मृतांची नावे असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांनी दिली.

शेतकरी एकनाथ दगडू आगळे यांच्या शेतातील शेततळ्यातील पाण्यात उतरताच मृत तरुणांचा माशांच्या जाळ्यामध्ये पाय अडकला. यातूनच दोघेही पाण्यात बुडाल्याची प्राथमिक माहिती आहे. सतीश आगळे हा पदवीच्या प्रथम वर्षात तर गौरव हा नुकताच दहावी उत्तीर्ण झाला होता. माहिती मिळताच परिवारातील सदस्यांसह ग्रामस्थ, पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन पंडित, उपनिरीक्षक राम बारहाते आदी घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही भावंडांना शेततळ्यातून बाहेर काढून आडुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे सतीश आगळे व गौरव आगळे यांंना तपासून मृत घोषित करण्यात आले. घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.