मदरशांत दहशतवाद, बंदुकीचे शिक्षण दिले जाते, असा कांगावा मागील अनेक वर्षांपासून सातत्याने केला जात आहे. या पाश्र्वभूमीवर मशिदींतील एकूण व्यवहारावर संशय व्यक्त करणाऱ्यांच्या डोळय़ांत झणझणीत अंजन घालावे, असे सकारात्मक प्रयत्न जालना-औरंगाबादपाठोपाठ उस्मानाबादमध्येही सुरू झाले आहेत. नमाज अदा करण्यापूर्वी इसिसच्या दुष्कृत्याचा निषेध करणारी प्रवचने मशीद आणि मदरशांमधून सुरू झाली आहेत. या प्रभावाखाली येणाऱ्या तरुणांना थांबवण्यासाठी मुस्लीम समाजातील कार्यकत्रे व मौलवींनी सुरू केलेला हा सामाजिक उपक्रम दहशतवादाला चोख उत्तर देणारा आहे.
पाकिस्तानातील बाचा खान विद्यापीठात अतिरेक्यांनी धर्माच्या नावावर विद्यार्थ्यांच्या डोक्यात गोळय़ा घातल्या. या प्रकारामुळे हवालदिल झालेल्या मराठवाडय़ातील मुल्ला-मौलवी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मशीद आणि मदरशांमधून सकारात्मक चळवळ सुरू केली आहे. इसिस आणि दहशतवादी संघटनांच्या अमानवी कृतीच्या विरोधात लग्न समारंभापासून मदरशांपर्यंत प्रवचने झडू लागली आहेत. अशा गरमार्गाचे समर्थन इस्लाम कधीच करणार नाही, असा संदेश देण्यासाठी उस्मानाबाद शहरातील मुल्ला-मौलवी आणि सामाजिक कार्यकत्रे पुढे आले आहेत.
आंतरराष्ट्रीय पातळीवर धर्माचा अमानवी बुरखा पांघरून काही मूलतत्त्ववादी संघटना धुमाकूळ घालत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर या विरोधात अनेक ठिकाणी निषेधाचा पवित्रा घेण्यात आला, मात्र केवळ निषेध नोंदवून चालणार नाही. तर अशा वाईट कृतीच्या प्रभावाखाली येणाऱ्या तरुणांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी सामाजिक चळवळ रुजवणे गरजेचे आहे. हे ध्यानात घेऊन उस्मानाबाद शहरात मुस्लीम समाजातील कार्यकत्रे आणि मुल्ला-मौलवी सरसावले आहेत. मदरशांमध्ये मुलांना शिक्षण देणारे मौलाना महंमद जाकीर अली खान विद्यार्थ्यांना इस्लामची खरी शिकवण कशी शांतताप्रिय आहे, याबाबत मोठय़ा तळमळीने दाखले देत आहेत. अंगावर बॉम्ब बांधून किंवा डोक्यात गोळय़ा घालून निरपराध नागरिकांचा जीव घेणे इस्लामला कधीच मान्य होणार नसल्याचे विद्यार्थ्यांमध्ये िबबवत आहेत.
सरकारवर विश्वास ठेवा, हा देश सर्वाचा आहे, असा संदेश मौलाना रिझवी मोहम्मद देत आहेत. काही तरुणांना इसिसचे आकर्षण आहे. पण हे आकर्षण अज्ञानातून आणि काहीतरी धाडस करण्याच्या वृत्तीतून निर्माण होते, मात्र असा प्रभाव घेतलेल्या अनेकांना या वाटेहून दूर करण्यात आम्ही यशस्वी झालो असल्याचे नगरसेवक आणि सामाजिक कार्यकत्रे खलील सय्यद यांनी सांगितले. दहशतवादी संघटना कोणतीही असो, ती इस्लामच्या विरोधातच असते. इस्लाम दहशतवादाला कधीच मान्यता देत नसल्याचे सामाजिक कार्यकत्रे मसूद शेख यांनी सांगितले.