छत्रपती संभाजीनगर – केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (सीटीईटी) सोडताना विवाहित महिला उमेदवारांना त्यांचे मंगळसूत्र काढून प्रवेश देण्यात आल्याचा प्रकार येथील काही केंद्रांवर घडला असून, त्यावरून राजकारण पेटले आहे. माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वरील प्रकारावरून टीका केली आहे.
परीक्षार्थी आणि शिक्षक संघटनांकडून मिळालेल्या माहितीनुसार परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश देताना कुठलाही दागिना किंवा (मेटलचा प्रकार) अलंकारासह प्रवेश देता येणार नाही, असे परीक्षेच्या नियमावलीतच म्हटले असल्याचे सांगून त्या नियमाकडे लक्ष वेधण्यात आले आहे. मात्र, सोन्याचे दागिने कसे, कुठे ठेवणार, असा प्रश्न उपस्थित झाल्यामुळे परीक्षा केंद्रांवर गोंधळ उडाल्याचे चित्र होते.
महाराष्ट्र राज्यासह देशभरातील विविध केंद्रांवर केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) रविवारी घेण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमधील २७ केंद्रांवर ही परीक्षा दोन सत्रात पार पडली. सकाळी ७.३० वाजता केंद्रावर परीक्षार्थींना प्रवेश देण्यास सुरुवात झाली. त्यावेळी तपासणी करून पाठवत असताना प्रवेशपत्रावर देण्यात आलेल्या नियमानुसार ऑर्नामेंट, आर्टिफिशियल ज्वेलरी, गॅझेट, मॅगनेट असलेले साहित्य नेण्यास बंदी घातली होती. त्याआधारे महिला उमेदवारांना गळ्यातील मंगळसूत्रही काढून बाहेर ठेवण्याचे सांगण्यात आले होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये २७ केंद्रावर १२ हजार ६६० परीक्षार्थी होते. दुपारच्या सत्रातील पेपर २ ते ५ या वेळेत घेण्यात आला.
चौकशी केली जाईल
महिला परीक्षार्थींच्या गळ्यातील मंगळसूत्र उतरवण्यात आल्याच्या तक्रारी यापूर्वीही आलेल्या आहेत. या प्रकाराची आपण माहिती घेऊ. यापूर्वी घडलेल्या प्रकारावेळी काही साधनांच्या आधारे गैरप्रकार झाल्याचे समोर आले होते. परंतु, रविवारी घडलेल्या प्रकाराची माहिती घेऊन चौकशी केली जाईल. – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.
मंगळसूत्राचा प्रकार निषेधार्ह
परीक्षार्थी महिलांच्या अंगाववरील मंगळसूत्र हा दागिना असला तरी तो शोभेचा नाही तर सौभाग्याचे प्रतीक आहे. केंद्रात आणि राज्यात हिंदुत्ववादी सरकार असताना महिला उमेदवारांना मंगळसूत्र उतरवल्याशिवाय परीक्षा देता येणार नाही, अशा प्रकारची धाकदपटशा केली जात असेल तर ते निषेधार्ह असल्याचे दानवे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
