छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीमध्ये घ्या असा आग्रह करुन झाल्यानंतर ‘एमआयएम’ ची भूमिका ठरविण्यासाठी रविवारी असदुद्दीन ओवैसी छत्रपती संभाजीनगर येथे येणार आहेत. विधानसभा निवडणुकीतून प्रदेशाध्यक्ष इत्मियाज जलील यांना कोणत्या मतदारसंघातून निवडणुकीस उभे करायचे याचा निर्णय तेव्हा घेतला जाईल, असे माजी खासदार जलील यांनी स्पष्ट केले. ‘संभाजीनगर ( पूर्व )’ की ‘संभाजीनगर (मध्य)’ या दोन मतदारसंघांपैकी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवायची, याचा निर्णय जाहीर न करता आपल्या उमेदवारीबाबत संभ्रम कायम ठेवण्यात जलील यांना यश आले आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये औरंगाबाद शहरातील तीन मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघांत आघाडी मिळविण्यात इम्तियाज जलील यांना यश मिळाले होते. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात ‘एमआयएम’ चे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील. मात्र, कोणत्या मतदारसंघातून कोण उमेदवार याचे तपशील जाहीर होऊ नयेत, असा संभ्रम कायम ठेवण्यात आला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ’एमआयएम’ला त्यांचा प्रभाव कायम ठेवता आला नव्हता. औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून डॉ. गफ्फार कादरी पराभूत झाले होते. अतुल सावे यांना यश मिळाले. औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून प्रदीप जैस्वाल यांना यश मिळाले होते. त्यामुळे एमआयएमच्या विधानसभेतील प्रभाव कमी झाला होता. आता लोकसभेत पराभूत झाल्यानंतर इम्तियाज जलील हे पुन्हा विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. या पूर्वी ते औरंगाबाद मध्य मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. भाजप व शिवसेनेतील मतांच्या विभागणीचा त्यांना लाभ झाला होता.

हेही वाचा – गणेशोत्सवाच्या माध्यमातून रायगडमध्ये मतांची बेगमी

हेही वाचा – मराठवाड्यात भाजपच्या वाट्याच्या पाच जागा कमी होण्याची शक्यता

आता औरंगाबाद मध्य मतदारसंघातून शिंदे गटाचे प्रदीप जैस्वाल, ठाकरे गटातून दोन इच्छुकांची नावे समोर केली जात आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मतविभागणीचा लाभ होईल असा एमआयएमचा होरा आहे. अशीच परिस्थिती औरंगाबाद पूर्वमध्येही असेल. भाजपचे अतुल सावे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राजू वैद्य असे मत विभाजन होईल, असा दावा करत या मतदारसंघात जलील बांधणी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. अलिकडेच त्यांनी मंत्री अतुल सावे यांच्या सहाय्यकाने गैर मार्गाने जमीन खरेदी केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे जलील हे पूर्व मतदारसंघातून लढतील असा दावा केला जात आहे. ‘आम्हाला तयारीची गरज नाही. आम्ही निवडणूक लढवू’ असे जलील यांनी नुकतेच सांगितले. पण मतदारसंघ कोणता याचा संभ्रम त्यांनी कायम ठेवला. विधानसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून उतरायचे याचा निर्णय ओवैसी घेतील, असे ते सांगत आहेत.