पैठणगेट परिसरातील कॉलसेंटर तीन दिवसापूर्वी उत्तराखंडच्या डेहाराडून आणि औरंगाबाद पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत उद्ध्वस्त केले होते.
याच कॉलसेंटरची गुन्हेशाखेच्या पोलिसांनी घेतलेल्या झडतीत दोन तलवारी, दोन धारदार चाकू, एक एअरगन, रिव्हॉल्वरची मॅग्जीन, ११ राऊंड असा मुद्देमाल सापडला आहे.
झोहेब सय्यद (वय ४५,रा.सेव्हनहिल परिसर) यांच्या पैठणगेट परिसरातील बागवान मंगल कार्यालयाजवळ असलेल्या यश इंटरप्रायजेस या कॉलसेंटरवर तीन दिवसांपूर्वी उत्तराखंडच्या डेहराडून सायबर पोलिसांनी आणि औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हेशाखा, सायबर पोलीस आणि क्रांतीचौक पोलिसांनी संयुक्तरित्या छापा मारला होता. त्यावेळी या कॉलसेंटरमधून जवळपास १ हजार मोबाईल हॅण्डसेट पोलिसांनी जप्त केले होते. या कॉलसेंटरमधून देशातील विविध राज्यांत फोनद्वारे ऑनलाइन फसवणूक करण्यात येत होती, असा आरोप डेहराडून पोलिसांनी केला आहे.
हेही वाचा – ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप, मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
हेही वाचा – औरंगाबाद : प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसला आग
गुन्हेशाखा पोलिसांनी या कॉलसेंटरची झाडाझडती घेतली असता त्या ठिकाणाहून दोन धारदार तलवारी, दोन धारदार चाकू, एक एअरगन, एक रिव्हॉल्वरची मॅग्जीन, ११ राउंड, एक अॅश ट्रे, असा एकूण ६ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी गुन्हेशाखेचे सहाय्यक फौजदार शेख हबीब शेख मोहम्मद खान (वय ५०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून झोहेब खान, रविकिरण कुमार मनवर (वय ३१, रा. भोईवाडा) यांच्याविरुद्ध क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक विकास खटके करीत आहेत.