औरंगाबाद : अग्निवीर भरती दरम्यान पळताना दमछाक होऊन भोवळ आलेल्या तरुणाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. करण नामदेव पवार असे या २० वर्षांच्या तरुणाचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 कन्नड तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील करण रहिवासी होता. त्याचा भाऊ सागर व करण हे दोघे भरतीसाठी औरंगाबाद येथे आले होते. भरती दरम्यान शारीरिक चाचणी दरम्यान गुरुवारी रात्री धावताना तो भोवळ येऊन पडला होता. त्याला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मैदानावर गेल्या दोन दिवसापासून भरती सुरू आहे. भरतीसाठी आलेले अनेक तरुण या भागातच मुक्कामी आहेत.

रात्री मैदानी चाचणी दरम्यान करण पवार याने पळण्याच्या तीन फेऱ्या पूर्ण केल्या होत्या. चौथ्या फेरीच्या वेळी अंतिम रेषेजवळ तो कोसळला. त्याला जवळच असणाऱ्या घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीनंतर त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. भरतीसाठी करण सोबत आलेला भाऊ सागर म्हणाला,की त्याने घरुन आणलेली भाकरी खाल्ली होती. धावताना चौथी फेरी पूर्ण करताना तो खाली कोसळला. करण व सागर यांना आई नाही आणि वडीलही सतत आजारी असतात, त्यामुळे भरती होऊ असे त्यांनी ठरविले होते. बेगमपुरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Death agniveer recruitment government medical hospital ysh
First published on: 19-08-2022 at 00:02 IST