औरंगाबाद : करोनानंतर आक्रसलेल्या अर्थकारणात मदत व्हावी म्हणून पथविक्रेत्यांना कर्ज देण्यासाठी आखलेल्या योजनेतील कर्ज आता ५० हजार रुपयांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात दहा हजार रुपये त्याची परतफेड केल्यानंतर २० हजार रुपये व नव्याने त्यात वाढ करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली. पंतप्रधान स्वनिधी योजनेस सरकारकडून सात टक्के व्याज दरात सवलत दिली जाते. त्यामुळे या योजनेतून कर्ज घेण्यास अनेक जण उत्सुक आहेत. आतापर्यंत २२ लाख ६९ हजार ४७७ जणांना या योजनेचा लाभ झाला आहे.

करोनाकाळात हातावर पोट असणाऱ्या पथविक्रेत्यांचे मोठे हाल झाले. पण याच काळात पथविक्रेत्यांचे सर्वेक्षणही करण्यात आले व त्यांच्यासाठी कर्ज योजनाही सुरू करण्यात आली. २०२०-२१ मध्ये २० लाख ५७ हजार तर २०२१-२२ मध्ये आठ लाख १२ हजार ४१८ लाभार्थी होते. आतापर्यंत सरकारने सवलती पोटी ३९ कोटी ३३ लाख ५० हजार रुपयांची सवलत देण्यात आली आहे. या योजनेमुळे अनेकांना व्यावसाय उभे करणे पुन्हा शक्य झाल्याने पथविक्रेत्यांना कर्ज देण्याची प्रक्रिया अधिक गतिमान करण्यात आली. आता नव्याने कर्ज परतफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याचे निर्देश एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या बैठकीत देण्यात आले. गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेशात पथविक्रेत्याचे कर्जवितरण मोठय़ा प्रमाणात झाल्याची आकडेवारी राज्यसभेत डॉ. कराड यांनी दिली. कर्जवाढ करण्याचा निर्णय २७ एप्रिलच्या बैठकीत घेतल्याचे त्यांनी औरंगाबाद येथे ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.