बिपिन देशपांडे

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचा निर्णय

औरंगाबाद : डिजिटल आणि उपग्रहांकित युगात कालबाह्य यंत्रणा असलेली देशभरातील दूरदर्शनची ५१० लघु व उच्चशक्ती (एलपीटी-एचपीटी) प्रक्षेपण केंद्रे ३१ ऑक्टोबर २०२१ व ३१ मार्च २०२२ पर्यंत टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने घेतला आहे. या संदर्भातील आदेश प्रसारभारती दूरदर्शन महानिदेशालयाने काढले आहेत.

 या केंद्रांच्या ठिकाणची डीडी अ‍ॅनॉलॉग टेरेस्ट्रिअल टीव्ही ट्रान्समीटर (एटीटी) यंत्रणा असून आधुनिक डिजिटल, उपग्रहांकित माध्यमांच्या (सॅटेलाइट) तुलनेत जुनी, कालबाह्य झालेली आहे. त्यामुळे ती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

राज्यातील…

या ५१० बंद होणाऱ्या केंद्रांमध्ये औरंगाबाद केंद्रांतर्गत येत असलेले सटाणा, जालना, तसेच महाराष्ट्रातील अकोला, अचलपूर, अंबाजोगाईजवळील पिंपळा (धा.), कोल्हापूरअंतर्गतचे चिपळूण, देवरुख, राजापूर, नागपूर, रत्नागिरी, जळगाव, बीड, अहमदनगर, बुलडाणा आदी केंद्रांचा समावेश आहे.

औरंगाबाद केंद्रांतर्गत सटाणा आणि जालना केंद्रे येतात. म्हैसमाळ केंद्र हे डिजिटल (डीटीटी-डिजिटल टेरेस्ट्रिअल ट्रान्समीटर) यंत्रणेने जोडलेले आहे. आता डिजिटल यंत्रणेचे युग आहे. त्यामुळे हे केंद्र बंद होणार नाही.

– सतीश सहस्राबुद्धे, कार्यालयीन प्रमुख, दूरदर्शन केंद्र, म्हैसमाळ

काही केंद्रे बंद करणे ही अपरिहार्यता असली तरी नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे मनोरंजनाची अन्य माध्यमे कार्यान्वित करता येऊ शकतील. अंबाजोगाईजवळील पिंपळा येथील केंद्र उपयोगात आणले तर त्याचा लाभ तीन ते चार जिल्ह्यांना मिळू शकेल. त्यासाठी मागील अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. उपलब्ध जागा, इमारत आणि कर्मचारीवृंद कामी येऊ शकेल. 

– चेतन सौंदळे, स्वीकृत सदस्य, परळी न. प.