गेल्या वर्षीच्या तुलनेत मराठवाडय़ाच्या चार जिल्ह्यांतील अपघातांत मृत्यू झालेल्यांच्या संख्येत पहिल्यांदाच घट झाली आहे. अवैध दारूविक्री आणि रस्ता दुभाजकांच्या दुरुस्तीसाठी पोलिसांनी केलेला पाठपुरावा यामुळे ही संख्या घटली आहे. सन २०१४ मध्ये १ हजार २५ अपघातांत १ हजार १४२ जणांचा, तर मागील वर्षी ९७४ अपघातांत १ हजार ८३ जणांचा मृत्यू झाला. विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी मोहीम सुरू केली होती. त्याचा हा परिणाम असल्याचे सांगितले जाते. अपघातातील मृत्यूंची संख्या वाढत असल्याचेच चित्र होते. गेल्या वर्षी तुलनेत ही संख्या ५९ने कमी आहे.
दिवसेंदिवस गाडय़ांची संख्या वाढते आहे. रस्तेही चांगले नाहीत. परिणामी, अपघात वाढले आहेत. रस्ते दुभाजकांची दुरुस्ती करून घेण्यासाठी पोलीस महानिरीक्षकांनी पाठपुरावा केला. तसेच ढाब्यांवरील दारूविक्रीलाही आळा घातला. तसेच वेगमर्यादा न पाळणाऱ्या ४२९जणांवर दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या ३४९जणांवर कारवाई करण्यात आली होती. त्याचा परिणाम जाणवू लागला असल्याचा दावा नांगरे पाटील यांनी केला.
औरंगाबाद ग्रामीण, बीड व जालना या तीन जिल्ह्यांत अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, उस्मानाबाद जिल्ह्यात अपघातातील मृत्यूचे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा अधिक आहे. उमरगा ते नळदुर्ग तसेच उस्मानाबादपर्यंत राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. परिणामी, अरुंद रस्त्यावरून होणारी वाहतूक व उपचारासाठी चांगले रुग्णालय नसल्यामुळेही अपघातातील व्यक्ती मृत होण्याचे प्रमाण येथे अधिक असल्याचे सांगितले जाते. या चार जिल्हय़ांमधील २४४ ठिकाणे अपघातप्रवण क्षेत्र आहेत.