पठण तालुक्यातील हिरपुरी व आपेगाव या उच्च पातळी बंधाऱ्यांत पिण्यासाठी पाणी सोडावे, या मागणीसाठी अन्नदाता शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने करण्यात आली. त्यांनी ६ फेब्रुवारीला पाणी सोडण्याबाबत आश्वासन दिले होते. ते न पाळल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी संघटनेचे जयाजी सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले.
आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यांत गेल्या चार महिन्यांपासून पाणी नाही. जायकवाडी जलाशयातून या बंधाऱ्यात पाणी सोडावे, अशी मागणी सातत्याने होत आहे. २ फेब्रुवारी रोजी पठण येथे ५ हजार शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यांनी औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचे ठरविले होते. मात्र, भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी दूरध्वनी करून या प्रश्नी लक्ष घालू, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले होते. प्रश्न सोडवू असे आश्वासन देऊनही ते न पाळल्याने शेतकऱ्यांनी दानवे यांच्या औरंगाबाद शहरातील निवासस्थानासमोर निदर्शने केली.
जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याबाबतचे सर्व अधिकार आता जलसंपदा विभागाकडून काढून ते विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत. मात्र, आश्वासन देऊन ११ दिवस उलटून गेले असल्याने व पूर्वीच्या आंदोलनास यश न आल्याने सूर्यवंशी व कार्यकर्त्यांंनी गांधी पुतळ्याजवळ आत्मक्लेश आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी गांधी पुतळ्याचा परिसर स्वच्छ केला.