छत्रपती संभाजीनगर : परवाच्या पावसात देवणी तालुक्यातील बोंबळी गावातील काशिनाथ गायकवाडच्या एक बैल वीज पडून मेला. आयुष्यभर फक्त बटईने शेती करुन जगणाऱ्या काशिनाथरावांना जणू अपंगत्वच आले. आता जू कोणाच्या खांद्यावर द्यायचा असा प्रश्न आला आणि त्यांनी बैलाबरोबर पत्नी हौसाबाईला जुंपले. याचे चित्रण कोण्या वाटसरुने काढून समाजमाध्यमी टाकले आणि मदतीचा ओघ सुरू झाला. यातून सरकार विरोधी प्रतिमा अधिक गडद होत असल्याने तहसीलदारांनी मग ३५ हजार रुपयांची मदत बँक खात्यात जमा केली.
बोंबळी गावातील काशिनाथ गायकवाड यांना शेती नाही. ते बटईने शेती करतात. या वर्षी हनुमंत पाटील यांनी दहा एकर शेती बटईने घेतली. ही शेती करण्यासाठी मग चार महिन्यापूर्वी बैलजोडी घेतली. एक लाख २५ हजारातील या जोडीचे काशिनाथ गायकवाड यांना मोठे कौतुक होते. सोम्या आणि राम्या अशी त्यांची नावे.
सोम्या नावाच्या बैलावर चार दिवसापूर्वी वळवाच्या पावसात वीजपडून तो मेला. मग हौसाबाईंनी कंबर कसली. बैलाचा जू खांद्यावर घेतला. दहा एकर शेतीची मशागत करायची तर पुढे कसे जायचे असा प्रश्न समोर होताच. समाज माध्यमी चलचित्रण पुढे आले आणि दिवसभरात काही जणांनी मदत केली. काशिनाथराव गायकवाड सांगत होते, ‘ मला लाखभर रुपयांची गरज आहे. मग फार काही लागणार नाही.’
बटईने शेती करुन काशिनाथरावांनी चार मुलींचे लग्न केले. दोन मुले आहेत. आता एक मुलगा मजुरी करतो आणि दुसरा मुलगा मजुरीबरोबर हलगी वाजवून पैसे कमावतो. सारे जगणे बैलाभोवती. एक बैल मेला आणि काशिनाथरावांचे चाक रुतून बसले. स्वत: च्या नावावर एकरभरही शेती नसल्याने काशिनाथराव गायकवाड शेतकरी नाहीत. त्यामुळे कोणत्या योजनेस पात्र ठरले नाहीत. जगण्याचा आणि मेहनतीचा सारा आधार बैलजोडी. आता एक बैल गेला. त्याची मदतही मिळाली. पण आता बैल घेण्यासाठी पुन्हा अधिकचे २० – २५ हजार रुपये लागणार आहेत. ती मदत कदाचित मिळेल. पण एक बैल मरतो तेव्हा शेती करणाऱ्याचे काय हाल होतात, हे या निमित्ताने समोर आले आहे.
खरे अशा कुटुंबात दुभती जनावरे असतील तर पैसा फिरता राहतो. तसे दुभते जनावरही घरी नाही. त्यामुळे मजुरीवर जगणाऱ्या काशिनाथराव यांच्यासमोर जगण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या वर्षी खतांचे भाव वाढले आहेत. युरिया मिळेल की नाही माहीत नाही. काशिनाथराव आणि हौसाबाई पुन्हा राबताहेत. एखाद्या गोशाळेतून बैल आणून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगण्यात येत आहे.
