धनंजय मुंडे यांचा आरोप

लोकभावना ऐकून न घेता, लोकप्रतिनिधींसोबत चर्चा न करता, मंत्रिमंडळाची बैठक घेऊन चर्चा करण्याची परंपराच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोडली असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. तसेच गेल्या १५ महिन्यांत अनेकदा बठक घेण्याबाबत विनंती केली, तेव्हा वेळ का मिळाला नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. जे जे मराठवाडय़ाच्या हक्काचे आहे, ते येथेच राहू द्या, असा टोलाही त्यांनी लगावला.

विभागीय आयुक्त कार्यालयात बठक सुरू होण्यापूर्वी मुंडे यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मराठवाडय़ातील विविध प्रश्नांबाबत निवेदन सादर केले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुंडे म्हणाले,की काही दिवसांपासून सातत्याने पाऊस झाल्याने अनेक पिके उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने प्रति एकर निकषावर मदत दिली जावी, काही ठिकाणी लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, त्यांना आíथक मदत जाहीर करावी, मराठवाडय़ातील आíथकदृष्टय़ा डबघाईस आलेल्या जिल्हा सहकारी बँकांना विदर्भाच्या धर्तीवर विशेष पॅकेज देऊन आíथक मदत करावी. मराठवाडय़ातील सर्व लोकप्रतिनिधी, जनतेशी चर्चा करून प्रश्न जाणून घेऊन निर्णय घेणे अपेक्षित होते; मात्र असे झाले नाही, हे दुर्दैव. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विदर्भाच्या धर्तीवर विशेष पॅकेज देण्यात यावे, येथील मोठय़ा, मध्यम, लहान सिंचन प्रकल्पांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव मंत्रालयीन स्तरावर वर्षांनुवष्रे प्रलंबित आहेत.

सर्व प्रलंबित प्रस्तावांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यासाठी विशेष कृतिगट स्थापन करून निर्णय करावा, वेळोवेळी केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाने सुचविलेल्या उपाययोजना व दुष्काळ निवारणासाठी राज्य शासनाला दिलेल्या निर्देशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी विशेष बाब म्हणून त्याच्या अंमलबजावणीचा निर्णय करावा,

मेक-इन महाराष्ट्राच्या धर्तीवर मेक-इन मराठवाडा याकडेही लक्ष द्यावे, २०१५च्या खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन या नगदी पिकाचे अनुदान रखडलेले असून, ते तातडीने वाटप करावे.

या वेळी आमदार सतीश चव्हाण, आमदार अमरसिंह पंडित, आमदार राजेश टोपे, आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, आमदार विजय भांबळे, आमदार विक्रम काळे उपस्थित होते.

 ओबीसी आरक्षणाला धक्का नको

नाशिक येथील ओबीसी मोर्चात सहभागी होतो. यानंतर बीड येथे मोर्चा निघणार असेल, तर तेथेही सहभागी होईन. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, अशी ओबीसी समाजाची मागणी आहे. तसेच मराठा समाजाचीदेखील त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्यावे, अशीच मागणी आहे. मराठा क्रांती मोर्चानी देशाला, राज्याला आदर्श परंपरा घालून दिली आहे. त्यांच्या मागण्या मान्य करण्यास वेळ लावू नये.

भगवानबाबाचे दर्शन म्हणजे दसराच

भगवानगडावर दसरा मेळावा घेण्यावरून सध्या जोरदार वाद सुरू आहेत, त्यावर आपली भूमिका काय आहे, असा प्रश्न विचारला असता, मुंडे म्हणाले, ‘मी भगवानबाबा यांचा भक्त आहे. ज्या दिवशी त्यांचे दर्शन होते, तो दिवस माझ्यासाठी दसरा असतो. कोण काय करतेय मला त्यावर बोलायचे नाही,’ असे सांगून तेथे सुरू असलेल्या राजकारणावर बोलण्यास त्यांनी नकार दिला.