छत्रपती संभाजीनगर – राज्याचे माजीमंत्री अन्न व नागरीपुरवठामंत्री तथा परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांचे फेसबुक अकाउंट बनावट पद्धतीने उघडून त्यावर काही आक्षेपार्य पोस्ट डकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या खाजगी जनसंपर्क अधिकाऱ्याकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत गावत यांनी या प्रकरणी कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे जनसंपर्क अधिकारी सुदर्शन सांगळे यांच्या माध्यमातून बीड सायबर पोलीस ठाण्यामध्ये बनावट फेसबुक खाते उघडून त्यावर काही आक्षेपार्य मजकूर लिहिल्या संदर्भात फिर्याद दिली आहे.
फेसबुकवर बनावट खात्याच्या माध्यमातून पाठवलेले आक्षेपार्ह संदेश हे जाणीवपूर्वक बदनामीचा प्रयत्न असून, त्याबाबतची जबाबदारी फक्त बनावट खाते संचालन करणाऱ्यांची असेल, असे फिर्यादीत नमूद केले असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणाचा तपास करून संबंधितांना लवकर अटक करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिल्याचे सांगण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त कळताच धनंजय मुंडे हे बुधवारीच बारामतीकडे रवाना झाले.
गुरुवारीही मुंडे हे बारामतीमध्येच असून, याच दिवशी मुंडे यांच्या निकटवर्तीयांना नेत्याच्या फेसबुक अकाऊंटवरील संदेश पाहून संशय आला. ज्या काही आक्षेपार्ह पोस्ट तयार करण्यात आलेल्या होत्या, त्यावरून फेसबुक अकाऊंट बनावट पद्धतीने तयार केल्याचा संशय बळावल्याची खात्री पटताच मुंडे यांचे जनसंपर्क अधिकारी सुदर्शन सांगळे यांनी तातडीने तक्रार दाखल केली आहे.

