जालना – धनगर समाजाचा अनुसूचित जमातींमध्ये (एस.टी.) समावेश करण्यासाठी दीपक बोऱ्हाडे यांच्या मुंबईतील आझाद मैदानावरील बेमुदत उपोषणास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. परंतु या आंदोलनासाठी जालना जिल्ह्यातून अनेक जण मुंबईकडे रवाना होण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने १७ जानेवारी (शनिवारी) रोजी जालना त्याचप्रमाणे अंबड या शहरांत संचारबंदी लागू करण्यात आल्याचा आदेश काढला आहे. शनिवारी सकाळी पाच ते रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान हा आदेश लागू राहणार आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी काढलेल्या या आदेशातून शासकीय-निमशासकीय कार्यालये, वैद्यकीय सुविधा, रेल्वे, प्रसारमाध्यमे आणि अन्य कांही बाबींना वगळण्यात आले आहे. आदेशात म्हटले आहे की, दीपक बोऱ्हाडे १७ जानेवारी रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास जालना येथून मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषणास बसण्यासाठी रवाना होणार आहेत. त्यांच्या उपोषणास मुंबई येथील आझाद मैदान पोलिसांनी १५ जानेवारी २०२५ रोजी परवानगी नाकारली आहे.
बोऱ्हाडे आपल्या मागणीसाठी उपोषण करण्यासाठी १७ जानेवारी रोजी जालना शहरातून अंबड, जालना, जामखेड, पाचोड, दावलवाडी, पैठण नाका, शेवगाव, अहिल्यानगर तसेच पुढे पंढरपूर, सांगोला आणि पुणे जिल्ह्यांतून मुंबईकडे उपोषणासाठी रवाना होणार आहेत. सध्या संबंधित जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता सुरु आहे. त्यामुळे बोऱ्हाडे यांना या जिल्ह्यांतून आंदोलनकर्त्यांसह मुंबईकडे जाण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने नोटीशीद्वारे बोऱ्हाडे यांना यासंदर्भात कळविले आहे.
या आंदोलनाच्या निमित्ताने धनगर समाजाचे आंदोलनकर्ते जालना आणि अंबड शहरात विविध ठिकाणी एकत्र येऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १७ जानेवारी रोजी जालना आणि अंबड शहरांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. वेळेअभावी बोऱ्हाडे यांना नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी पुरेसा वेळ नसल्याने संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालये, दुकाने, आस्थापना यांनाही हा आदेश लागू राहणार असल्याचे आदेशात म्हटले आहे
