जालना – धनगर समाजाचा अनुसूचित जमातींमध्ये समावेश करावा या मागणीसाठी येत्या एकवीस जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषणास बसणार असल्याचे आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांनी जाहीर केले होते. त्यांच्या उपोषणास पोलिसांनी परवानगी नाकारली होती. या पार्श्वभूमीवर बोऱ्हाडे आणि त्यांच्या समर्थकांनी मुंबईकडे रवाना होऊ नये यासाठी पोलिसांनी त्यांना नोटिस बजावली होती. दरम्यान शनिवारी (१७ जानेवारी) जिल्हा प्रशासनाने या पार्श्वभूमीवर जालना आणि अंबड शहरात संचारबंदी जारी केली होती. शनिवारी दुपारपूर्वी पोलिसांनी बोहाडे यांना त्यांच्या जालना शहरातील छत्रपती कॉलनीतील निवासस्थानातून ताब्यात घेतले.
त्यानंतर वकील अशोक तारगे यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले की, बो-हाडे यांना त्यांच्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेणे हे कायद्याचे उल्लंघन आहे. अधिकारांचा दुरुपयोग करून आंदोलन दडपण्याचा हा प्रयत्न आहे. बो-हाडे यांनी यापूर्वी जालना येथे आपल्या मागणीसाठी उपोषण केले होते. त्यानंतर त्यांनी मुंबई येथील उपोषणाचा निर्णय घेतला होता. परंतु केवळ नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुका होईपर्यन्त सरकार गप्प बसले कारण त्यांना धनगर समाजाची मते हवी होती. त्यानंतर मात्र विरोधात भूमिका घेऊन बो-हाडे यांना ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप तारडे यांनी केला.
संचारबंदी जारी केल्याच्या काळात शनिवारी सकाळपासून बोऱ्हाडे यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांनी नाकाबंदी केली होती. पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वी प्रसारित ध्वनी चित्रफितीत दीपक बोऱ्हाडे यांनी सांगितले की, रात्रभरापासून आपल्या सहकाऱ्यांना पोलिस त्यांच्या घरातून अटक करीत आहेत. या निमित्ताने संचारबंदी जारी करणे निषेधार्ह आहे .कुणी या दाबल्याने आंदोलन दबणार नाही तर आणखी मोठे होईल. आंदोलकांनी पोलिसांना सहकार्य करावे आणि नियमानुसार अटक व्हावे. आंदोलन दडपण्याचे कृत्य निषेधार्ह आहे असेही ते म्हणाले.
दरम्यान जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी शनिवारी सकाळी पाच ते रात्री बारा वाजेपर्यन्त जालना आणि अंबड शहरांत संचारबदी जारी केली होती. शनिवारी दुपारी एक वाजता मुंबईतील उपोषणासाठी बोऱ्हाडे रवाना होणार होते. त्या पार्श्वभूमीवर हा संचारबंदी आदेश काढण्यात आला होता. त्यामुळे
शनिवारी या शहरांतील शाळा-महाविद्यालये बंद होती. रस्त्यांवर वाहतूक सुरु असली तरी बहुतेक भागांतील दुकाने संचारबंदीमुळे बंद होती. बो-हाडे यांच्या मुंबईतील आंदोलनास आझाद मैदान पोलिसांनी १५ जानेवारी रोजी परवानगी नाकारली होती. त्यानंतर जालना पोलिसांनी नोटीशीद्वारे त्यांना कळविले होते. बोऱ्हाडे ज्या मार्गाने मुंबईकडे जाणार आहेत त्या जिल्ह्यांत जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता सुरु आहे. त्यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने जालना आणि अंबड शहरांत विविध ठिकाणी आंदोलक एकत्र येऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता संचारबंदी जारी करण्याच्या आदेशात व्यक्त करण्यात आली होती.
