मुंबई : खरीप व रब्बी हंगाम २०२५ – २६ मध्ये धाराशिव जिल्ह्यातील कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कृषी निविष्ठा प्रत्यक्षात खरेदी न करता कागदोपत्री खरेदी आणि वितरण केल्याचे चौकशीत समोर आले आहे. सुमारे २१ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणी कृषी आयुक्तालयाने केलेल्या चौकशीत दोषी आढळलेल्या १४ अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित केले असून, २ वरिष्ठ अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू केली आहे. कृषी विभागाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.

आमदार कैलास पाटील यांनी या बाबतची तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर कृषी आयुक्तालयाने लातूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. या समितीच्या चौकशीत राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान अंतर्गत राबविण्यात आलेल्या एकात्मिक कीड व्यवस्थापन व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन कार्यक्रमात गंभीर अनियमितता झाल्याचे समोर आले.

लाभार्थी निवड, निविष्ठा वितरण, अभिलेख व्यवस्थापन, गुणवत्ता नियंत्रण, आर्थिक शिस्त, क्षेत्रीय पडताळणी व पर्यवेक्षण या सर्व स्तरांवर त्रुटी आढळून आल्या आहेत. भूमिहीन, मयत, दुबार व अपात्र लाभार्थ्यांना लाभ देणे, मंजूर क्षेत्रापेक्षा अधिक लाभ देणे, निविष्ठा वितरणाच्या नोंदी अपूर्ण ठेवणे, संशयास्पद स्वाक्षऱ्या करणे, बनावट कागदपत्रांचा वापर करणे, प्रत्यक्ष अंमलबजावणीचा पुरावा उपलब्ध नसणे, फवारणी सुरक्षा किटचे नियमबाह्य वाटप करणे, बियाणे, कीडनाशके, खतांचा शेतकऱ्यांना पुरवठा न करता, कागदोपत्री खरेदी, विक्री दाखविणे आदी गैरप्रकार समोर आले आहेत.

या प्रकरणी झालेली कारवाई

विभागीय चौकशी –

प्रमुख संनियत्रण अधिकारी म्हणून जबाबदार असलेले धाराशिव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे (सेवानिवृत्त) आणि प्रभारी अधीक्षक कृषी अधिकारी महादेव किसन आसलकर यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.

निलंबित –

महेश नामदेव देवकाते (तालुका कृषी अधिकारी, लोहारा), पुरुषोत्तम भानुदास वाघमारे (तंत्र अधिकारी, प्रभारी कृषी उपसंचालक), राहुल लिबराज दिवाने (तंत्र अधिकारी), अतुल अशोक ढवळे (तालुका कृषी अधिकारी भूम), आबासाहेब जितेंद्र देशमुख (तालुका कृषी अधिकारी, तुळजापूर) भागवत हनुमंत सरडे (तालुका कृषी अधिकारी, कळंब) ज्ञानोबा बाबासाहेब रितापुरे (तालुका कृषी अधिकारी, उमरगा) नानासाहेब नारायण लांडगे (तालुका कृषी अधिकारी, परंडा), राजाराम धनाजी बर्वे (तालुका कृषी अधिकारी, वाशी) पल्लवी मच्छिंद्र काटकर (मंडळ कृषी अधिकारी, अणदूर), सत्यजित गजेंद्र देशमुख (मंडल कृषी अधिकारी, नळदुर्ग), विठ्ठल गोविंद नागटिळक (मंडल कृषी अधिकारी), अमित अशोक भोसले (मंडल कृषी अधिकारी, तुळजापूर) राहुल गंगाधर सुर्यवंशी (सहाय्यक कृषी अधिकारी)

महाबीज, एमएआयडीसीचे काम निर्दोष

महाबीज, एमएआयडीसीच्या वतीने बियाणे, खते, कीडनाशके, फवारणी यंत्रे आदी निविष्ठांची रीतसर, नियमानुसार वितरण करण्यात आले आहे. पण, महाडीबीटीच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्या आणि शेतकरी गटांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या निविष्ठांमध्ये गैरव्यवहार झाला आहे. फक्त कागदोपत्री बिले काढून महाडीबीटीच्या अंतर्गत अधिकाऱ्यांनी पैशांचा अपहार केल्याचे समोर आले आहे. निलंबित केलेल्या प्रत्येक अधिकाऱ्यांची गैरप्रकार करण्याची पद्धत वेगळी असल्याचेही दिसून आले आहे.

धाराशिवमधील घटना अत्यंत दुर्देवी – कृषिमंत्री

केंद्र, राज्य सरकारच्या योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहविण्याची जबादारी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची असताना धाराशिवमध्ये उघडकीस आलेली घटना अत्यंत दुर्देवी आहे. या गैरप्रकारात सहभागी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल, असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटले आहे.