छत्रपती संभाजीनगर : परिस्थितीने रंजलेली-गांजलेली, पालकांचे छत्र हरपलेली, गरिबीच्या गर्तेत अडकलेली मुले जेव्हा आशेचा किरण शोधतात, तेव्हा धाराशिवमधील कसबे तडवळा येथील ‘जीवन विकास मुलांचे बालगृह’ त्यांच्यासाठी मायेचे छत्र बनून उभे राहते. केवळ पुस्तकी ज्ञान न देता, या मुलांच्या हातांना रोजगाराचे कौशल्य देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा ध्यास गुरुदत्त बहुउद्देशीय संस्थेचे आत्माराम पवार यांनी घेतला आहे.
आत्माराम आणि अनिता पवार हे जेमतेम साक्षर असलेले दाम्पत्य. त्यांनी अनाथ, एकल पालकांची, शेतकरी आत्महत्येनंतर पोरकी झालेली लेकरे यांना सावरण्याचे कार्य २००३ पासून सुरू केले. गुरुदत्त बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत साडेपाचशेहून अधिक मुलांना त्यांनी स्वावलंबी केले. मात्र हे करताना संस्थेचा गाडा हाकण्यासाठी स्वत:च्या मालकीचे आठ भूखंड विकले. कोरोना काळानंतर मात्र या बालगृहाची आर्थिक स्थिती खालावली. शासकीय अनुदानावरील मर्यादा आणि वाढत चाललेली उधारी यामुळे बालगृह चालवणे आव्हानात्मक बनले आहे. मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र आजही कायम असून, दररोज सरासरी तीन शेतकरी आपले जीवन संपवत आहेत. अशा पालकांचे छत्र हरपलेल्या मुलांना केवळ शालेय शिक्षण देऊन उपयोग नाही, तर हाताला रोजगार देणारे कौशल्य शिक्षण मिळणे गरजेचे आहे. यापूर्वी संस्थेने वाहन दुरुस्ती, वीज उपकरणे दुरुस्ती, वैद्यकीय सेवा, तसेच गणेशमूर्ती, राख्या आणि बैलजोड्या बनवण्याचे छोटेखानी उपक्रम राबवून मुलांना व्यावहारिक धडे दिले आहेत.
सध्या ग्रामीण भागात आधुनिक यंत्रसामग्री आणि उपकरणे पोहोचली आहेत; परंतु ती दुरुस्त करण्यासाठी आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ स्थानिक पातळीवर उपलब्ध नाही. बालगृहातील मुलांना असे तांत्रिक शिक्षण देऊन गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस आहे. यासाठी संस्थेत विविध कौशल्य विकास वर्ग सुरू करण्याचे नियोजन आहे. परंतु, आर्थिक टंचाईमुळे हे उपक्रम रोखले जाण्याची भीती आहे. समाजातील दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था आणि उद्योग जगताने या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन संस्थाचालक आत्माराम पवार यांनी केले आहे.
