छत्रपती संभाजीनगर : धाराशिव जिल्ह्यातील कळंबमध्ये शीतपेयातून दोन परिचारिकांना विषबाधा झाली असून त्यातील एकीची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले. हेच शीतपेय गजानन महाराजांच्या पालखीतील वारकऱ्यांना देण्यासाठी आणले गेले होते. मात्र, रात्रीतून कोणत्या कारणामुळे विषबाधा झाली हे स्पष्ट झाल्याने मोठा अनर्थ टळला.
कार्यालयीन काम संपवून घरी निघालेल्या परिचरिकांनी उपजिल्हा रुग्णालयाबाहेरील एका हॉटेलातून शीतपेय विकत घेतले. बसस्थानकात गाडी येण्याची वाट पहात असताना त्यांनी शीतपेय प्राशन केले त्यांनतर लागलीच त्यांना मळमळ सुरू झाल्याने त्यांनी स्वतःहून उपजिल्हारुणालय गाठले मात्र तोपर्यंत दोघींचीही प्रकृती गंभीर झाली होती . कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी व परिचरिकांनी तात्काळ उपचार सुरू केले. मात्र प्रकृती अधिक गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना लातूर व अंबाजोगाई येथे हलवण्यात आले आहे. हेच शीतपेय शेगाव येथील गजानन महाराज त्यांच्या पालखीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना वाटप करण्यासाठी घेऊन ठेवण्यात आले होते. तत्पूर्वी ही धक्कादायक घटना समोर आल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या वारीमध्ये भाविकांसाठी शीतपेयाचे वाटप केले जाणार होते. हे शीतपेय वाटण्यापूर्वी दोन परिचारिकांनी योगायोगाने ते शीतपेय हॉटेलमधून विकट घेतले. पूजा जाधव आणि पल्लवी सौदागर या दोन परिचारिकांनी शीतपेय प्राशन केले. यातील पूजा जाधव यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना लातूर येथील ‘गॅलेक्सी हॉस्पिटल’च्या अतिदक्षता विभागात हलवण्यात आले आहे.
ही बाब समजताच अन्न व औषध प्रशासन, पोलीस प्रशासन आणि सरकारी रुग्णालयातील कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वारीमध्ये हे शीतपेय मोठ्या प्रमाणावर वाटले जाणार होते. या शीतपेयाच्या सर्व बाटल्या जप्त करण्यात आल्या. यामुळे शेकडो वारकरी आणि भाविकांचे प्राण वाचले आहेत. सध्या अन्न व औषध प्रशासनाचे पथक आणि पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. हे शीतपेय नेमके कुठून आले? त्याचा पुरवठादार कोण होता? आणि हे शीतपेय वारीत वाटण्याचे नियोजन कोणी केले होते? याचा शोध घेतला जात आहे.
