धाराशिव : लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) या गावातील शिवारात खासगी कंपनीच्या पवनचक्कीला गुरुवारी सायंकाळी साडेच्यारच्या सुमारास अचानक आग लागली. पवनचक्कीच्या वरच्या नॅसेल (यंत्रसामग्री असलेल्या भागातून) आगीच्या ज्वाळा उसळू लागल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. आगीमुळे काळ्या धुराचे मोठे लोट आकाशात पसरल्याने ही घटना दूरवरूनही दिसून येत होती.

घटनेच्या वेळी परिसरातील शेतांमध्ये महिला मजूर खुरपणीचे काम करत होत्या. पवनचक्कीतून अचानक धूर व आगीच्या ज्वाळा उसळताना दिसताच महिलांनी जीव वाचवण्यासाठी शेतातून दूर पळ काढला. त्यामुळे काही काळ परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. आगीदरम्यान पवनचक्कीच्या वरच्या भागातील जळालेले लोखंडी व फायबरचे तुकडे खाली शेतात कोसळले. त्यामुळे शेतकरी देवानंद शिवकर यांच्या शेतातील सोयाबीन पिकाचेही नुकसान झाले. प्राथमिक माहितीनुसार, पवनचक्कीच्या यांत्रिक भागातील बिघाड किंवा शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, आगीचे नेमके कारण संबंधित कंपनीच्या तांत्रिक तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे.

या आगीत पवनचक्कीच्या वरच्या भागातील यंत्रसामग्रीचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर लोहारा नगरपंचायतीचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळी सुमारे सव्वा पाचच्या सुमारास अग्निशमन कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पवनचक्कीची उंची अधिक असल्याने आग विझविण्यात अडचणी येत होत्या.

लोहारा तालुक्यातील डोंगराळ भागात खासगी कंपन्यांच्या मोठ्या प्रमाणावर पवनचक्क्या उभारण्यात आल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमिनी दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्यावर देऊन या प्रकल्पांना जागा उपलब्ध करून दिली आहे. या प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती होत असली, तरी अशा प्रकारच्या दुर्घटनांमुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पवनचक्कीला आग लागल्यास केवळ यंत्रसामग्रीचेच नुकसान होत नाही; तर आगीच्या ठिणग्या किंवा जळणारे अवशेष शेतात पडल्यास उभ्या पिकांनाही मोठा धोका निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व पवनऊर्जा प्रकल्पांची नियमित तांत्रिक तपासणी, अग्निसुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करणे, तसेच अशा दुर्घटनांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्यास तातडीने भरपाई देण्याची प्रभावी यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.