धाराशिव : भूम तालुक्यातील ऐतिहासिक माणकेश्वर महादेव मंदिर परिसरातील सटवाई देवीच्या मूर्तीवर अनेक दशकांपासून साचलेला शेंदूर रासायनिक प्रक्रियेने काढल्यानंतर तिचे मूळ शिल्पवैशिष्ट्य उजेडात आले आहे. पुरातत्त्व विभागाच्या अहवालानुसार ही मूर्ती सरस्वतीची असल्याचे सांगण्यात येते. मूर्तीच्या हाती असणारे आयुधे व लक्षणे लक्षात घेऊन १२ व्या शतकातील सरस्वती मूर्तीचे उजळलेले रूप समोर आले आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागाच्या सहायक संचालक, पुरातत्त्व कार्यालयाने ९ जुलै २०२६ रोजी हा सविस्तर अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. माणकेश्वर मंदिरासाठी स्थापन झालेल्या स्मारकनिहाय महावारसा समितीच्या ११ जून २०२५ च्या बैठकीतील निर्णयानुसार २८ मार्च ते ५ एप्रिल २०२६ या कालावधीत हे रासायनिक जतन-संवर्धनाचे काम करण्यात आले. अनेक वर्षे धार्मिक प्रथेनुसार शेंदूर लावल्याने मूर्तीचे कोरीवकाम झाकले गेले होते. नियंत्रित रासायनिक प्रक्रियेने शेंदूर व सिमेंटचे थर काढल्यानंतर सुमारे ११० सें.मी. उंच व ७० सें.मी. रुंद आसनस्थ, चतुर्भुज मूर्ती दिसून आली. डोक्यावर किरीट मुकुट, मागे प्रभावळ, मकरतोरण व कीर्तीमुखाची रचना आढळली.
भग्न हात, आयुधे व पायाच्या बोटांची पुनर्निर्मिती करताना महादेव मंदिराच्या बाह्य भिंतीवरील यादवकालीन सहा सरस्वतीसदृश मूर्तींचा संदर्भ घेण्यात आला. वीणा, अक्षमाला, अंकुश, वेद/वही आणि हंस या लक्षणांमुळे मूर्तीचे सरस्वतीशी असलेले मूर्तिशास्त्रीय साम्य स्पष्ट झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
माणकेश्वरचे महादेव मंदिर शिलाहार-यादवकालीन म्हणजेच १२ व्या-१३ व्या शतकातील आहे. मूर्तीचे स्वरूप सरस्वतीशी जुळत असले तरी स्थानिकांची सटवाई देवीवरील श्रद्धा व मातृदेवता परंपरेचा आदर राखूनच हे संवर्धन केल्याचे पुरातत्त्व विभागाने स्पष्ट केले आहे.
पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांना सध्या अस्तित्वात असलेली सटवाई देवीची मूर्ती ही सरस्वती असल्याचे समजले. ग्रामस्थांसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही भूषणावह बाब आहे.- गणेश अंधारे, सामाजिक कार्यकर्ते, माणकेश्वर, भूम.
