छत्रपती संभाजीनगर : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनातील वाढीव मोबदल्याच्या १५४ प्रकरणांत २४१ कोटी ६२ लाख रुपयांच्या घोटाळ्यात तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना बीड पोलिसांनी न्यायालयासमोर उभे केल्यानंतर त्यांना सात दिवसांच्या पोलीस कोठडीचे आदेश जिल्हा न्यायालय क्र. २ च्या न्यायाधिश एस. आर. शिंदे यांनी दिले.

या प्रकरणात ७२ कोटी रुपयांचा वाढीव मोबदला वाटप करून अपहार झाला होता. या प्रकरणी बीडच्या शिवाजी पोलीस ठाण्यात दाखल दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. वाढीव मोबदल्यावरील आदेशातील अविनाश पाठक यांच्या स्वाक्षरीबाबतचे अहवाल तपासल्यानंतर त्यांना चौकशीसाठी लातूरहून ताब्यात घेण्यात आले. रात्री त्यांना अटक करण्यात आली.

दुपारी चारच्या सुमारास पाठक यांना जिल्हा न्यायालयात आणल्यानंतर पोलिसांनी आवाजाचे नमुने घेण्यासाठी तसेच या प्रकरणातील काही संचिकांचा तपास करण्यासाठी आरोपी पाठक यांना दहा दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. आरोपीकडून लॅपटॉप जप्त करणे, कॉल रेकॉर्डिंगसाठी आवाजाचे नमुने घ्यायचे आहे तसेच आरोपींची तीन ठिकाणी घरे आहेत. त्यातील लातूर ,पुणे आणि मुंबई या ठिकाणी झडती घ्यायची आहे असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले.

तर तपासा दरम्यान १५४ पैकी १४८ संचिका मिळून आल्या. सहा संचिका मिळाल्या नाहीत. त्याचा शोध घेणे बाकी आहे. त्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली. यावर आरोपीच्या वकिलांनी पोलीस कोठडीच्या मागणीला जोरदार विरोध केला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर उशिराने झालेली अटक, तसेच सर्व कागदपत्रे कार्यालयीन असल्याने पोलीस कोठडीची गरज नाही, असा युक्तिवाद आरोपीच्या बाजूने करण्यात आला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अविनाश पाठक यास सात दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली. आरोपीच्या वतीने के. पी. ठिगळे आणि मिलिंद वाघिरकर यांनी काम पाहिले. सरकारच्या वतीने अजय सरवदे यांनी बाजू मांडली.