छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात डिझेल तुटवड्यामुळे मशागतीचे काम थंडावले आहे. आधी ट्रॅक्टरसाठी डिझेल आणून द्या, मग शेती नांगरुन देऊ शकतो असे चालक सांगत आहेत. एका ट्रॅक्टरसाठी फक्त तीन हजार रुपयांचेच डिझेल मिळत आहे. परिणामी नांगरणीसाठी लागणारे डिझेल विकत घेण्यासाठी शहरात ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांनी रांगा लावल्या आहेत. विशेषत: लातूर, बीड, धाराशिव या जिल्ह्यात अशी स्थिती दिसून येत आहे.

दरम्यान लातूर शहरात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे बहुतांश पेट्रोलपंपांवर मंगळवारी सकाळपासूनच वाहनधारकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. इंधन भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. शहरात इंधनटंचाईची परिस्थिती कायम असून, अनेक पंपांवर साठा मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे. सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे इंधनाच्या मागणीत अचानक वाढ झाल्याने हा तुटवडा निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.

लातूर जिल्ह्यातील पानगाव येथील १६ एकर शेती असलेले शेतकरी मयूर चव्हाण यांनी सांगितले, की मागील आठ दिवसांपासून डिझेल टंचाई वाढत चालली आहे. एका वेळेस तीन हजार रुपयांचेच डिझेल मिळते, त्यात एक एकराचीही मशागत होत नाही. ट्रॅक्टर चालक रांगेत उभे राहत नाहीत. त्यामुळे मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांना आधी पेट्रोल पंपावर रांगा लावाव्या लागत आहेत.’

याचा परिणाम कृषी वाहतुकीवरही होतो आहे. दैनंदिन वाहतूक करणारे भाजीची छोटी वाहने, टेम्पो चालकांना इंधनाअभावी अडचणींचा सामना करावा लागत आहे. लातूर-धाराशिव, लातूर-सोलापूर, लातूर-नांदेड या मार्गांवर फळे व भाजीपाला वाहतूक करणाऱ्या वाहनचालक आणि मालकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

लातूरचे जिल्हा पुरवठा अधिकारी व्यंकटेश रावलोड म्हणाले, पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार असल्याच्या अफवेमुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकाच वेळी इंधन खरेदी केली. त्यामुळे साधारणतः तीन दिवस पुरेल इतका साठा असतानाही तो एका दिवसातच संपल्याने तुटवडा जाणवत आहे. लातूरमध्ये ५७ पेट्रोल पंपांवर तुटवडा जावणू लागला आहे. शहरी भागातही पेट्रोलपंपावर दुचाकीमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत.