नांदेड : नांदेडच्या पवननगर भागात एका सेवानिवृत्त शासकीय अधिकाऱ्याला केंद्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी असल्याचे भासवून तब्बल १४ लाख १५ हजार रुपयांना लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तुमचे दहशतवाद्यांशी संबंध असून मुंबईत गुन्हा दाखल झाल्याची भीती दाखवत सायबर भामट्यांनी वृद्ध अधिकाऱ्याला चक्क दोन दिवस घरातच ‘डिजीटल अरेस्ट’ करून ठेवले होते. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नांदेडमधील डिजीटल अरेस्टची ही अवघ्या काही दिवसांतील दुसरी मोठी घटना असल्याने खळबळ उडाली आहे.
शिवाजी संभाजीराव तुंबलवाड (वय ६७, रा. पवननगर, नांदेड) असे फसवणूक झालेल्या सेवानिवृत्त कोषागार अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी ‘प्रिया मॅडम’, अमित चौधरी, संदीपराव, प्रदीप जयस्वाल आणि अन्य एका अशा पाच जणांविरोधात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
हा थरार ३० जून ते ४ जुलै २०२६ दरम्यान घडला. सेवानिवृत्त अधिकारी तुंबलवाड यांना सुरुवातीला एका महिलेचा फोन आला. तिने आपण केंद्र शासनाची अधिकारी ‘प्रिया मॅडम’ बोलत असल्याचे सांगितले. त्यानंतर एकापाठोपाठ एक अशा काही फोन कॉलवरून अमित चौधरी, संदीपराव, प्रदीप जयस्वाल यांनी पोलीस अधिकारी बनून तुंबलवाड यांच्याशी संपर्क साधला व “तुमच्या सिमकार्डचा वापर देशविरोधी कारवायांसाठी झाला असून तुमचे दहशतवाद्यांशी संबंध आहेत. तुमच्यावर मुंबईत गंभीर गुन्हा दाखल झाला आहे,” अशी भीती या भामट्यांनी तुंबलवाड यांना घातली.
अचानक आलेल्या या संकटामुळे वृद्ध तुंबलवाड प्रचंड घाबरले. त्यांच्या याच भीतीचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांनी, “या प्रकरणातून बाहेर पडायचे असेल आणि खाते तपासायचे असेल, तर तात्काळ पैसे ट्रान्सफर करावे लागतील,” अशी बतावणी केली. घाबरलेल्या तुंबलवाड यांनी घरात असलेले सोन्याचे दागिने तातडीने मुथूट फायनान्समध्ये ठेवून ‘गोल्ड लोन’ काढले. या लोनचे एकूण १४ लाख १५ हजार रुपये त्यांनी भामट्यांनी दिलेल्या बँक खात्यावर ट्रान्सफर केले. हे पैसे नंतर परत मिळतील, असे आश्वासनही त्यांना देण्यात आले होते. या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत सप्रे हे करत आहेत.
दोन दिवस घरातच ‘डिजीटल अरेस्ट’
पैसे उकळल्यानंतर गुन्हेगारांनी तुंबलवाड यांना दम दिला की, “पुढील दोन दिवस तुम्ही घराबाहेर पडायचे नाही आणि कुटुंबासह कुणाशीही संपर्क करायचा नाही.” कारवाईच्या भीतीने तुंबलवाड दोन दिवस घरातच दहशतीखाली थांबले. मात्र, दोन दिवसांनंतरही काहीच हालचाल न झाल्याने आणि संशय आल्याने त्यांनी नातेवाईकांशी चर्चा केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून पाच जणा विरोधात गुन्हा दाखल केला.
