छत्रपती संभाजीनगर : डिजिटल व्यवहारांचा डंका जोरदार वाजवला जात असताना राज्यातील १९१ गावांमध्ये सशक्त आंतरजाल सुविधा नसल्यामुळे अडचणी असल्याची माहिती नुकतीच राज्याच्या मुख्य सचिवांसमोर बँक अधिकाऱ्यांनी सादर केली आहे. डिजिटल व्यवहार पुढे न्यायचे असतील तर आंतरजाल सुविधा काम करण्यावर भर द्यावा तसेच बँक अधिकारी आणि दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यांनी या गावांना संयुक्त भेटी द्याव्यात, अशा सूचना बँक समितीच्या बैठकीत देण्यात आल्या आहेत.
आंतरजाल सुविधा नसणारी सर्वाधिक गावे पालघर जिल्ह्यात असून त्याची संख्या ६१ आहे. डिजिटल पद्धतीने व्यवहाराची गती वाढत असली तरी गावांगावांमध्ये ही प्रक्रिया पुढे नेण्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे, असे यावेळी नमूद करण्यात आले.गडचिरोलीमध्ये २२, नंदूरबार २४, सोलापूर १८, पुणे ७, सिंधुदुर्ग २, सातारा ५, सोलापूर १८ , लातूर १५ गावांमध्ये तसेच अहमदनगर, वर्धामध्ये प्रत्येकी एक तर पुणे जिल्ह्यात सात गावांमध्ये आंतरजाल सुस्थितीमध्ये आणण्यायची गरज व्यक्त करण्यात आली.



