scorecardresearch

कोविडसाथीच्या प्रभावानंतर निर्गुंतवणुकीकरणालाही वेग येणार

पवनहंस लि. ही हेलिकॉप्टरच्या उड्डाणाच्या व्यवसायात काम करणारी कंपनी असून त्याचे ४९ टक्के शेअर ओएनजीसीचे असून ५१ टक्के शेअर केंद्र सरकारचे आहे.

|| सुहास सरदेशमुख

मार्चअखेरीस एलआयसीचाही आयपीओ

औरंगाबाद : कर्ज ओझ्याने जर्जर झालेल्या एअर इंडियाचे निर्गुंतवणीकरण पूर्ण झाले आहे. मात्र, हवाई वाहतुकीत ४३ हेलिकॉप्टरची मालकी असणाऱ्या पवनहंस लि.ची निर्गंतुवणकीकरण अद्याप बाकी आहे. ते लवकरच पूर्ण केले जाईल तसेच भारतीय विमा निगम (एलआयसी) चा प्रारंभिक समभाग मूल्य (आयपीओ) मार्चअखेरीस निघेल, अशी माहिती केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

पवनहंस लि. ही हेलिकॉप्टरच्या उड्डाणाच्या व्यवसायात काम करणारी कंपनी असून त्याचे ४९ टक्के शेअर ओएनजीसीचे असून ५१ टक्के शेअर केंद्र सरकारचे आहे. पवनहंसबरोबरच देशातील विविध कंपन्यांचे निर्गुंतवणकीकरण करण्याचे ठरविण्यात आले होते. यामध्ये कंटनेर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, फेरो स्क्रॅप निगम लि. (एफएसएनएल), हिंदुस्तान लाईफ केअर लि., प्रॉजेक्ट अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट इंडिया लि., भारत अर्थ मुव्हर्स लि., इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, निलाचल इस्पात निगम लि. या कंपन्यांचाही समावेश आहे. गेल्या दोन वर्षांपासून करोनाच्या साथीमुळे निर्गुंतवणकीकरणाच्या प्रक्रियेलाही फटका बसला होता. मात्र, आता त्याला वेग देण्यात येणार आहे. ‘या वर्षी एक लाख कोटी वस्तू व सेवा कर जमा होईल असा अंदाज होता. मात्र, कोविड काळातही १.३१ लाख हजार कोटी रुपयांचा वस्तू व सेवा कर जमा झाला आहे. त्यामुळे आर्थिक गती चांगली आहे. या वर्षीचा अर्थसंकल्प अधिक आशा निर्माण करणारा असेल’, असा दावा डॉ. भागवत कराड यांनी केला.

पवनहंस या हेलिकॉप्टर कंपनीमार्फत मराठवाड्यातील जगप्रसिद्ध वेरुळ आणि र्अंजठा लेणींचा प्रवास सुकर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार होते. मात्र, ते सारे आता बासनात गुंडाळून ठेवण्यात आले आहे. वेरुळ, र्अंजठा या दोन्ही लेणींच्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरण्यासाठी स्थळही निर्माण करण्यात आले. मात्र, त्याचे पुढे काहीही झाले नाही. आता पवनहंसचेही निर्गुंतवणकीकरण केले जात असल्याचा दावा केला जात आहे.

पवनहंसच्या अधिकृत संकेतस्थळावर या कंपनीचा २०१९-२० मधील तोटा केवळ २८ कोटी रुपये एवढा होता. तत्पूर्वीच्या वर्षात म्हणजे २०१८-१९ मध्ये तो ६९ कोटी रुपयांचा होता. निर्गुंतवणकीकरण करण्याची प्रक्रिया या अर्थसंकल्पानंतर अधिक वेगात होईल, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, १ फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पापूर्वी तयारीसाठी झालेल्या बैठकांमध्ये महाराष्ट्र सरकारमधील प्रमुख नेत्यांनी फारसे लक्ष दिले नव्हते, असा आरोपही डॉ. कराड यांनी केलेला आहे.

या कंपन्यांचे निर्गुंवणुकीकरण होणार

कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, फेरो स्क्रॅप निगम लि. (एफएसएनएल), हिंदुस्तान लाईफ केअर लि., प्रॉजेक्ट अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट इंडिया लि.,भारत अर्थ मुव्हर्स लि., इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, निलाचल इस्पात निगम लि.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Disinvestment will also accelerate after the impact covid infection lic also has an ipo at the end of march akp