स्टीलच्या दरामुळे वाढीव तरतुदीवरही वरिष्ठ मंत्र्यांमध्ये चर्चा

औरंगाबाद : रेंगाळत सुरू असणाऱ्या १६८० कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंमलबजावणीत स्टीलचे भाव वाढल्याने योजनेच्या मूळ रकमेत ३० टक्के वाढ मिळावी, असा कंत्राटदाराचा प्रस्ताव बुधवारी पाणी पुरवठा विभागाने स्वीकारला. त्यास मंजुरी देण्यापूर्वी योजनेच्या पहिल्या टप्प्यात कंत्राटदाराने पूर्ण करावयाची कामे अशीच रेंगाळू देऊ नका, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा कंत्राटदारास देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान रेंगाळलेल्या कामाबाबत पालकमंत्री सुभाष देसाई यांनीही नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, सध्या होणारा अपुरा व कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा काही अंशी सुरळीत करता येईल काय, याची चाचपणी करण्यासाठी मुंबईतील काही तज्ज्ञांची मदत घेतली जाणार असून काही निवृत्त अधिकाऱ्यांची या कामासाठी प्रतिनियुक्तीही केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

पालकमंत्री सुभाष देसाई, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे, सचिव संजीव जैस्वाल यांच्यासह, महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

स्टीलचे दर वाढल्याने तरतुदीपेक्षा सुमारे २५० कोटी रुपये अधिकचे लागतील, असा प्रस्ताव कंत्राटदार कंपनीकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सुभाष देसाई यांनीही पाणी पुरवठा योजनेची पाहणी केली होती. अलीकडेच कंत्राटदार कंपनीने जलवाहिनी निर्मितीचे कामही सुरू केले होते. मात्र, कांचनवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान जलवाहिनी टाकण्याचे काम तातडीने हाती घेण्यात यावे तसेच जलकुंभ बांधकामाची गती वाढवावी या सूचनांकडे कंत्राटदाराने दुर्लक्ष केले होते. कामाची गती योग्य राखली जात नसल्याचे दिसून येत होते. त्यातच स्टीलचे भाव वाढल्याने पाणी पुरवठा योजना रखडण्याची चिन्हे दिसू लागली होती. कंत्राटदाराने मागितलेल्या वाढीव तरतुदीचा प्रस्ताव स्वीकारण्यात आला असून छाननीअंती त्यास मंजुरी मिळण्याची दिली जाईल असे सांगण्यात आले. वाढलेले दर व दिलेला प्रस्ताव याची पडताळणी केली जाणार आहे. तसेच शहरातील जुन्या पाणी पुरवठा योजनेत काही बदल करून शहरातील काही भागात कमी दाबाने होणारा अपुरा पाणीपुरवठा सुरळीत करता येईल काय, याची चाचपणी करण्यासाठी मुंबईतील तज्ज्ञांची मदतही घेण्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.