छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या येमेन येथील रहिवाशी सालाह सालेह अहमद ओबादी याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावली आहे. परिणामी विदेश प्रादेशिक नोंदणी कार्यालय यांनी याचिकाकर्त्याला सहकुटुंब त्याच्या मायदेशी परत पाठविण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
भारतातील वास्तव्याची मुदत संपल्यामुळे याचिकाकर्त्याने मायदेशी परत जाण्याबाबत संबंधित कार्यालयाने याचिकाकर्त्याला पारपत्र व परवाना रद्द केल्याची विद्यापीठातूनच पीएचडी अभ्यासक्रम पूर्ण करेपर्यंत भारतात राहू देण्याची त्याची विनंती होती. याचिकाकर्ता विद्यार्थी व्हिसावर २०१७ मध्ये भारतात आला होता. सन २०२० मध्ये त्याने विद्यापीठातून एमए इंग्रजी पदवी प्राप्त केली. त्यानंतर २०२१ मध्ये त्याने नोंदणी केली होती.
पीएचडी इंग्लिशचे विद्यापीठात ३० मार्गदर्शक आहेत. त्यापैकी डॉक्टर शेख परवेज असलम हे त्याचे मार्गदर्शक होते. मागील दोन-तीन वर्ष मार्गदर्शक व याचिकाकर्त्यांचे संबंध चांगले होते. मात्र, मार्गदर्शकाने तीस हजार रुपये मागितल्याच्या आरोप करत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. त्यामुळे शेख यांनी काम करण्यास नकार दिला. विद्यार्थी सहाय्य कक्षाच्या संचालिका सुचिता यांनादेखील याचिकाकर्त्याने मानसिक त्रास दिला. अशा अनेक तक्रारी विद्यार्थ्याच्या होत्या. त्याच्या विरोधातील अहवाल लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने विदेशी विद्यार्थ्याची भारतात राहू देण्याची याचिका फेटाळली.