छत्रपती संभाजीनगर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिक्षक प्रवर्गाच्या ७३ जागांसाठी राज्य शासनाच्या नवीन नियमावली व कार्यपध्दतीप्रमाणे भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यापूर्वी अर्ज केलेल्यांना नव्याने ‘एटीआर’ भरावा लागणार असून नवीन उमेदवारांनाही अर्ज दाखल करता येणार आहे. संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार असल्याची माहिती कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिली.
महाराष्ट्रातील सार्वजनिक विद्यापीठातील अध्यापकांच्या निवड प्रक्रिया राबविण्यात बाबत राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने ११ फेब्रुवारी रोजी कार्यपध्दती संदर्भात शासन आदेश जारी करण्यात आला. या नुसार ‘एटीआर’ भरण्यासंदर्भात निश्चिती करण्यात आली. ६०ः२०ः२० या प्रमाणे शैक्षणिक सत्र (अकॅडमिक) नोंदणी, अध्यापन कौशल्ये व मुलाखत असे प्रमाणे निश्चित करण्यात आले आहे. शिक्षक प्रवर्गातील ७३ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यामध्ये मुख्य परिसर तसेच धाराशिव उपपरिसरातील जागांचा समावेश आहे.
यामध्ये मानव्यविद्या, वाणिज्यशास्त्र, आंतरविद्याशाखा व विज्ञान तंत्रज्ञान या चारही विद्याशाखेतील जागांचा समावेश आहे. यामध्ये प्राध्यापक प्रवर्गातील आठ तर सहयोगी प्राध्यापक पदाच्या १२ जागा आहेत. तर सहाय्यक प्राध्यापकांच्या ५३ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
या जागांसाठी केंद्र शासनाच्या ‘समर्थ पोर्टल’च्या माध्यमातून २६ फेब्रुवारी ते १२ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तर १८ मार्चपर्यंत आस्थापना विभागात दोन प्रतीत मुख्य प्रत (हार्ड कॉपी) दाखल करता येणार आहे. कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, असेही कुलसचिव डाॅ. अमृतकर यांनी सांगितले.
चार अधिष्ठातांचीही पदे भरणार
चारही विद्याशाखांच्या अधिष्ठातांची पदे १ जानेवारी २०२४ पासून रिक्त आहेत. सध्या या पदांवर प्रभारी नेमणूका करण्यात आलेल्या आहे. या जाहिरातील चारही विद्याशाखांच्या अधिष्ठातांचीही पदे तसेच ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक पद भरण्यात येणार आहे. यापूर्वी आवेदन दाखल केलेल्या उमेदवारांना अर्ज करण्याची आवश्यकता असणार नाही तर नव्याने अर्ज दाखल करण्यासाठीही वरील प्रमाणेचे तारीख निश्चित करण्यात आली आहे.

