छत्रपती संभाजीनगर : पावसामुळे गुडघ्यापर्यंत वाढलेले गवत, एका झाडाला बांधलेला पाच फूट उंच करड्या रंगाचा बैल, प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकासह चार व्यक्ती, इमारतीतील दोन्ही बाजूच्या खोल्यांमधून जाणारी निर्जन वाट, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील सध्याचे चित्र. विद्यापीठातील संशोधकांच्या ५२ खोल्यांच्या या वसतिगृहात केवळ १० विद्यार्थी, त्यातही प्रत्यक्ष तीन ते पाचच विद्यार्थी नियमित वास्तव्यास असल्याने संशोधक घडवण्याच्या उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याची चर्चा आहे.

विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जवळच असलेल्या ‘सिद्धार्थ संशोधक मुलांचे वसतिगृह क्र. २’मध्ये सध्या १० विद्यार्थी आहेत, तर चार विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. मात्र, ते अद्याप राहण्यासाठी आले नाहीत. प्रत्यक्षात वसतिगृहात दोनच विद्यार्थी. उर्वरित अनेक खोल्यांना कुलूप. काही विद्यार्थी हे ग्रंथालय, अभ्यासिका किंवा विषयांशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी बाहेर गेलेले. विद्यापीठात पीएच.डी.साठी येणार्‍यांची ही अवस्था. त्यातच वसतिगृहाचे सुरक्षाकवच ‘अभेद्य’ असल्यासारखे आहे. २४ तासांतील आठ सत्रांसाठी तीन सुरक्षारक्षक येथे तैनात असतात.

विद्यापीठात २४ जुलै २०२४ रोजी झालेल्या पीएच. डी. प्रवेशपूर्व परीक्षेचा (पेट) मोठा वाद आहे. ही परीक्षा दोन-दोनवेळा गुणवाढ झाल्याने वादात सापडली असून, १२ विद्यार्थी न्यायालयात गेले आहेत. त्यातील एका प्रकरणात एका गुणवंत विद्याथ्र्याने त्याला डावलून कमी गुण असलेल्या विद्यार्थिनीला पीएच. डी. प्रवेश दिल्याच्या मुद्द्यावरून न्यायालयात धाव घेतली आहे. अशाच काही प्रकरणांमुळेही संशोधक विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले आहेत. मात्र त्यातून विद्यापीठ प्रशासनाला अद्याप मार्ग काढता आलेला नाही.

सिद्धार्थ संशोधक विद्यार्थी वसतिगृहात ५२ पैकी १२ खोल्यांमध्ये संशोधक विद्यार्थी राहत आहेत. मागणीप्रमाणे विद्यार्थ्यांना खोल्या पुरवण्यात येतात. तथापि, एकही संशोधक विद्यार्थ्यांचा खोली मागणीसाठी अर्ज प्रलंबित नाही. मागणी केल्यास खोली देण्यात येईल. – डॉ. सुनील नरवडे, मुख्य अधीक्षक, वसतिगृह विभाग.