भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या समवेत भाजप रुजविण्यात ज्यांनी कसोशिने प्रयत्न केले., विलासराव देशमुख गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय मैत्रभाव कायम असला तरी निवडणुकांमध्ये कमळचिन्ह सातत्याने जनतेच्या मनात रहावे म्हणून निवडणुका लढणारे डॉ. गाेपाळराव पाटील यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी सकाळी निधन झाले. मृत्यूसमयी ते ९४ वर्षाचे होते.
लातूरच्या शिक्षण प्रारुपाची ओळख वाढविण्यात योगदान देणारे शिक्षणप्रेमी अशी ओळख असणारे डॉ. गोपाळराव विठ्ठलराव पाटील हे शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते. महाराष्ट्राच्या शिक्षण आणि राजकारण क्षेत्रा स्वतःचा वेगळा ठसा निर्माण करणारे डॉक्टर गोपाळराव पाटील यांचा जन्म ३ ऑक्टोबर १९३१ रोजी झाला होता.
डॉ. पाटील हे व्यवसायाने बालरोगतज्ज्ञ हाेते. १९६५ साली त्यांनी लातूरमध्ये खाजगी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. त्याचबरोबर मुरुड परिसरात तब्बल १२ वर्षे विनामूल्य वैद्यकीय सेवा देत त्यांनी समाजात वेगळे स्थान निर्माण केले. त्यांच्या या सेवाभावी कार्यामुळे लोक त्यांना ‘देवमाणूस’ म्हणून ओळखत होते. पुढे त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोठे कार्य केले. शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी लातूरमध्ये शिक्षणाची भक्कम पायाभरणी केली. याच प्रयत्नांतून पुढे लातूर प्रारुप उदयास आले.
राजकारणातही ठसा
राजकीय क्षेत्रातही डॉ. गोपाळराव विठ्ठलराव पाटील यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले. मराठवाड्यात भारतीय जनता पार्टीचा पाया मजबूत करण्यात त्यांची भूमिका मोठी होती. लातूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्याविरोधात अनेक निवडणुका लढवल्या.
१९९१ ते १९९९ दरम्यान त्यांनी चार वेळा लोकसभा निवडणूक लढवली होती. विशेषतः १९९८ मधील निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली होती. त्यांच्या राजकीय कार्याची दखल घेत त्यांना राज्यसभेवरही संधी देण्यात आली होती. विलासराव देशमुख आणि शिवराज पाटील चाकुरकर यांच्या विजय पर्वात भाजपकडून निवडणूक लढविणारा व्यक्ती कोण, याचे उत्तर लातूरकर डोळे झाकुन देत ते नाव म्हणजे गोपाळराव पाटील.
डॉ. पाटील यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी ५ वाजता नवीन एमआयडीसी परिसरातील शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या क्रीडा मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. डॉ. पाटील यांना वाचन, प्रवास आणि गझलांचा विशेष छंद होता. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, संस्कृत आणि फ्रेंच या भाषा त्यांना अवगत होत्या. लोकांशी जुळवून घेण्याची कला असल्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वांना भावणारे होते.
