छत्रपती संभाजीनगर : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. वाल्मिक सरवदे यांनी सोमवारी दुपारी पदाचा राजीनामा दिला. त्या संदर्भातील माहिती देताना डाॅ. सरवदे यांनी आपली मुंबई विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चेयर प्राध्यापकपदी निवड झाली असून, केंद्राकडून ही नियुक्ती पाच वर्षांसाठी असल्याचे ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
विद्यापीठाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्याकडे डॉ. वाल्मिक सरवदे यांनी राजीनामा सोपवला. विद्यापीठ प्रशासनाने हा राजीनामा स्वीकारला असून सोमवारी (६ एप्रिल) दुपारी कार्यमुक्त केल्याची माहिती कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिली. डॉ. सरवदे हे फेब्रुवारी २०२४ पासून प्र-कुलगुरूपदी कार्यरत होते. तर गेल्या ३० वर्षांपासून वाणिज्यशास्त्र विभागात कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी वाणिज्यशास्त्र विभागात प्राध्यापक, विभाग प्रमुख, विद्यार्थी विकास मंडळ संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक, वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता आदी पदांवर काम केले आहे. तसेच अखिल भारतीय वाणिज्य परिषदेचे (ऑल इंडिया कॉमर्स काँग्रेस) अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.
विद्यापीठात येण्यापूर्वी त्यांनी विवेकानंद महाविद्यालयात अधिव्याख्याता म्हणून कार्य केले आहे. विविध ठिकाणी आवेदन दाखल करण्यासाठी पाच ते सहा वेळा विद्यापीठ प्रशासनाकडून त्यांनी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) घेतले होते. मुंबई विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनावर त्यांची नियुक्ती झाली असून लवकरच पदभार घेणार आहेत. त्यामुळे त्यांनी प्रकुलगुरूपदाचा राजीनामा दिला आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिली.
राजीनामा दिल्यानंतरची चर्चा
डाॅ. सरवदे यांचे नाव विद्यापीठाच्या पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षेतील (पेट) वादातून चर्चेत आले होते. गुण वाढीचा आरोप करणाऱ्या सुमारे डझनभरापेक्षा अधिक प्रकरणे विद्यापीठ प्रशासनाकडे आली होती. त्यामुळे हा वाद केंद्रस्थानी आलेला होता. पेट परीक्षेत झालेल्या या गोंधळाची चर्चा विद्यापीठ अनुदान आयोगापर्यंत आणि औरंगाबाद खंडपीठापर्यंतही वाद पोहोचल्याची चर्चा होती. तसेच महाविद्यालयांच्या संलग्निकरणाचा वादही विद्यापीठांतर्गत चर्चेत आला होता. याशिवाय १३३ महाविद्यालयांनी पदव्युत्तर शिक्षणातील अभ्यासक्रम सुरू केल्यानंतर नियुक्त समित्यांकडून पाहणी व या संबंधित अन्य विषयही चांगलेच गाजलेले होते. या वादाची चर्चा राजभवनपर्यंत पोहोचल्याने डाॅ. सरवदे यांना राजीनामा द्यावा, असे सांगण्यात आले होते. परंतु स्वत: डाॅ. सरवदे यांनी राजीनाम्यासाठी ३१ मार्चची मुदत मागून घेतली होती. मात्र, मागून घेतलेली मुदत संपून आठवडा लोटल्यानंतरही डाॅ. सरवदे राजीनामा देण्यास इच्छुक नव्हते, अशी चर्चा सुरुवातीला हाेती. परंतु स्वतःच डाॅ. सरवदे यांनी आपली नियुक्ती मुंबई विद्यापीठात झाल्याचे सांगितल्याने त्यांच्या राजीनाम्याविषयीच्या चर्चेचा धुराळा सायंकाळनंतर खाली बसल्याचे चित्र हाेते.
