छत्रपती संभाजीनगर : दुष्काळाची परिस्थिती हाताळणाऱ्या ११ विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री तथा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार संवेदनशील असून लवकरच मदतीचा योग्य निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.

हिंगोली जिल्ह्यातील आराटी येथे त्यांनी पिकांची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “शेतातील सोयाबीन पीक हातचे गेले आहे. तसेच कापूस व इतर पिकांनाही फटका बसला आहे. कापसाचे पीक वरवर जरी हिरवे दिसत असले तरी खाली पाते व बोंडे लागलेली नाहीत. राज्यातील ७५ टक्के भाग दुष्काळात सापडला आहे.”

राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली आहे. या समितीच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक भागात पाहणी केली जात आहे. त्यानंतर मदतीबाबत अभ्यास केला जाणार आहे. विमा व एनडीआरएफच्या निकषांनुसार मदत यातून जे जास्त देता येईल ते शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रत्येक पिकनिहाय काय मदत करणे अपेक्षित आहे याची माहिती सरकारला देऊ,” असेही बावनकुळे म्हणाले.

राज्यात दुष्काळ हाताळणाऱ्या महसूल, कृषी, जिल्हा परिषद, पाणी पुरवठा, वीज कंपनी, पशुसंवर्धन विभाग, जलविभाग यासह ११ विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याबाबत काही जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र देखील काढले आहे. सर्व क्षेत्रीय पातळीवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गावात राहिले तर वस्तुनिष्ठ पंचनामे होतील, असे ते म्हणाले. राज्यात पुढील काही दिवसांतच पंचनामे पूर्ण होतील, असे त्यांनी सांगितले.

काँग्रेसने अडवला बावनकुळेंचा ताफा

राज्यात शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, मुख्य निवडणूक आयुक्तांवर कारवाई करावी या मागणीसाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले होते. यावेळी महसूल मंत्री बावनकुळे कार्यालयासमोरून जात असताना काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सुमारे १० मिनिटे त्यांचा ताफा अडवला, त्यानंतर त्यांना मागण्यांचे निवेदन दिले.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळण्याची अपेक्षा असतानाच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मदतीबाबत महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. पिकांचे पंचनामे आणि संपूर्ण अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मदतीचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. आजच्या आज मदत जाहीर केल्यास काही शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे परिस्थितीचा सविस्तर आढावा घेणे आवश्यक असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.