छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्ह्यातील मादळमोही नावाच्या लहानशा गावात टँकर बांधणीच्या कामाला आता वेग आला आहे. अहिल्यानगर आणि मुंबईतून येणार्या २० फूट लांबीच्या पोलादी पत्र्याची उलाढाली लाखोंच्या घरात सुरू झाली आहे. दुष्काळामुळे टँकर नोंदणीचा जोर वाढतो आहे. त्यामुळेच दररोज दोन याप्रमाणे या गावातील १० गॅरेजमध्ये टँकरचा व्यवसाय तेजीत आहे.
मादळमोही हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गाव. गावातील बहुतांश गॅरेजवर आता टँकर बनविण्याच्या कामांना वेग आला आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे काही जुन्या टँकरची दुरुस्ती केली जात असे. पण जसा पावसाचा खंड वाढला तशी टँकरची मागणी वाढली. या गावातील फिरोज शेख म्हणाले, ‘‘आम्ही वर्षभरात २०० ते २५० टँकर बनवतो. पण आता गेल्या दोन आठवड्यात ५०- ५५ टँकर बनविण्याचे काम केले आहे. आता किमान दिवसाला एक असा टँकर निर्मितीचा दर आहे. ’’
मराठवाड्यातील टँकरचा बहुतांश व्यवहार अहिल्यानगरशी जोडलेला आहे. येथून लोखंडी कच्चा माल आणला जातो. या वर्षी लोखंडाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली. पोलादाच्या विविध प्रकारच्या पट्ट्यांची निर्मिती आणि पुरवठ्याच्या क्षेत्रातील उद्योजक व सीआयआय या औद्योगिक संघटनेचे माजी अध्यक्ष रमण आजगावकर म्हणाले, ‘आखाती युद्धामुळे गॅसच्या किमतीमध्ये वाढ झाली. इंधनामध्ये दरवाढ झाली, परिणामी लोखंडाच्या किमतीमध्ये ३० ते ३५ टक्के भाव वाढलेले आहेत. याचे परिणाम सर्वस्तरात उमटतील. विशेष म्हणजे वाहन उद्योगातही धातूच्या पट्ट्यांची मागणी अधिक आहे. यामुळे दर चढेच आहेत. गेल्या आठ दिवसांपासून नव्याने पुरवठाही बंद आहे. कदाचित प्रतिकिलो आणखी तीन रुपयांपर्यंत दरवाढ होईल. यामुळे टँकर निर्मितीसाठी अधिक रक्कम लागू शकते.’
एका टँकर बांधणीला किती पत्रे ?
एक टँकर बनवण्यासाठी साधारणत: २० फूट लांब, पाच फूट रुंद आणि तीन ते साडेतीन मिलीमीटर जाडीचा पत्र्या टँकर बनविण्यासाठी वापरला जातो. या आकाराचे सहा पत्रे एका टँकरला वापरले जातात. अशा धातूच्या पट्ट्या बनविण्याचे अनेक उद्योग आता मराठवाड्यातही आहेत. पण बीडमधील व्यवहार अहिल्यानगरशी जोडलेला आहे. मोठा पत्रा वाकवून त्याचा टँकर करणार्यांची मजुरीही वाढली. आता एक टँकर एक लाख ७० हजार रुपयांपर्यंत बनवला जातो. काही ठिकाणी कमी जाडीचा पत्रा वापरून ही किंमत कमी केली जाते. पण दुष्काळ आला आणि टँकर बाजारात तेजी आली. अगदी गावोगावी गॅरेजवर टँकर बांधणीला वेग आला आहे. या क्षेत्रात काम करणारे भीमराव जाधव म्हणाले, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी अधिक टँकर लागणार आहेत, हे माहीत असणार्यांनी आता नोंदणी करायला सुरुवात केली आहे. पण नोंदणीनंतर आठ-दिवसांनी टँकर तयार करून दिले जात आहेत.
