छत्रपती संभाजीनगर : साडेपाच एकरातील सोयाबीन पूर्णत: करपले. घरातील दोन म्हशींचे दुधापासून मिळणारे प्रतिमाह उत्पन्न चारा नसल्याने घसरले आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यात येरोळ या गावात सीमा सतपुरेच्या पोटात गोळा आला. त्यांची तीन मुले अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत आहेत. एक मुलगी हैदराबादला आणि दोघे पुणे येथे राहतात.

या तिघांना पैसे कसे पाठवायचे असा पेच निर्माण झाला आणि त्यांनी चार तोळे सोने गहाण ठेवून अडीच लाख रुपयांचे कर्ज उचलले. मुलांचे शुल्क भरले. पण दर महिन्याला लागणारा पैसा कोठून उभा करायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. दुष्काळाची तीव्रता अधिक असणाऱ्या लातूर जिल्ह्यातील चाकूर, शिरूर अनंतपाळ या भागात सोने तारण ठेवण्याचा कल वाढला आहे.

‘साडेपाच एकरातून मिळणाऱ्या उत्पन्नावर सगळा संसार होता. दोन म्हशीच्या दुधापासून दहा हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळायचे. आता ते सात हजारपर्यंत घसरले आहे. सोयाबीन हाती येणार नाही. पण मुलांचे अभियांत्रिकीचे शुल्क भरणे गरजेचे होते. वसतिगृहात राहणाऱ्या मुलांना पैसे तर पाठवावे लागतील. आता कसे पाठवायचे?’ हे सांगताना सीमा सतपुरे यांच्या डोळ्यात पाणी आले होते. शेतात आता जावेसे वाटत नाही.

करपलेले रान बघून तरी काय करणार? खरे लाडकी बहीणचे पैसे काही दिवस मिळाले. मग बंद झाले. बंद का झाले ते कळाले नाही. पण पुन्हा अर्ज भरला. मग काही महिने पुन्हा पैसे आले. आता पुन्हा पैसे मिळणे बंद झाले आहे. सगळीकडून मिळणारा आधारच हरवतो. आता दर महिन्याला मुलांना पैसे कसे पाठवायचे असा प्रश्न आहे. पूर्वी गावातील बचत गटात पुढाकार घेणाऱ्या सीमा यांनी मग बचत गटाकडून ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले. पाऊस या आशेवर काही दिवसांपूर्वी ती रक्कमही शेती कामातच गुंतवली. त्या कर्जाचा हप्ता बाकी आहे. गावातील अनेक जणींनी ‘मायक्रोफायनान्स’ चे कर्ज घेण्यास सुरुवात केली आहे. या कर्जाचा व्याजदर २४ ते २८ टक्के आहे.

पाणी फाऊंडेशनकडून होणाऱ्या विविध कामांतही सीमा सतपुरे सहभागी होत असत. पण आता त्याच अडचणीत सापडल्या आहेत. सोने तारण ठेवण्याची वेळ आली आहे. उत्पन्नाचा एकेक स्रोत आटू लागला आहे. पाणी फाऊंडेशनचे शिवलीश्वर मेदने म्हणाले, आम्ही पाच तालुक्यांत शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी काम करतो. पण आता परिस्थिती एवढी बिकट आहे की जगण्यासाठीच सोन गहाण ठेवणे किंवा गायी – बैल विकणे याशिवाय पर्याय राहिले नाहीत. सोने गहाण ठेवण्याचा कल वाढतो आहे. औसा, निलंगा, रेणापूर, शिरूर अनंतपाळ या भागात अशी स्थिती दिसून येते आहे.

गेले ५० दिवस पावसाचा थेंबही पडलेला नाही. जनावरांना चारा आणि पिण्याच्या पाण्याचे प्रश्न भेडसावू लागले आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष उत्तम होळीकर यांना या अनुषंगाने विचारले असता ते म्हणाले, ‘शेतकऱ्यांना दैनंदिन गरजेसाठी म्हणून सोने तारण योजनेतून कर्ज घेण्याचा कल वाढला आहे. त्याचा व्याजदरही पीक कर्जाएवढाच असतो. यामुळे गेल्या दीड – दोन महिन्यांपासून बँकांच्या कर्ज प्रकरणांमध्ये सोने तारण वाढले आहे.’आहे.