छत्रपती संभाजीनगर : येत्या दोन दिवसांत दुष्काळाबाबतचा शासन निर्णय काढला जाईल आणि शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. पंचनामे केवळ कायद्यात लिहिलेले आहेत म्हणून केले जात आहेत. त्यात सरकारला शेतकऱ्यांना अडकवून ठेवण्याची इच्छा नाही. मदत सरसकटच केली जाईल. लातूर जिल्ह्यातील खरोसा येथे भेट दिल्यानंतर ते बोलत होते. केवळ खरीपच नाही तर रब्बीचे नुकसान गृहीत धरून सरकार पाठीशी उभे राहील, असे ते म्हणाले.
लातूर जिल्ह्यातील पिकांची स्थिती अतिशय वाईट आहे. यापूर्वीच्या दुष्काळात ६३ टक्के पाऊस झाला होता. आता तर तो ५० टक्के झाला आहे. अशा परिस्थितीत पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या चाऱ्याची सोय सरकारकडून केली जाईल. काळजी करू नका आणि धीरही सोडू नका, असे आवाहन करत मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, पुढील तीन-चार महिने आपल्याला एकमेकांना सांभाळावे लागणार आहेत. या काळात सरकार आपल्या बाजूने उभे आहे. ज्या पाणीपुरवठा योजनांची देयके थकली आहेत, तीही राज्य सरकार भरले. प्रत्येक गावाला पिण्याचे पाणी मिळेल, असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले. खरोसा येथे आमदार अभिमन्यू पवार यांनी तालुक्यातील अडचणींसाठी मदत करावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली. खरोसा गावात वाळलेले सोयाबीन घेऊन शेतकरी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आले होते. परिस्थिती भयावह आहे. १९७२ पेक्षाही परिस्थिती गंभीर असल्याचे मान्य करत फडणवीस यांनी सांगितले की, येत्या दोन दिवसांत सरकार दुष्काळाबाबतचा शासन निर्णय जारी करेल.
लातूर जिल्ह्यातील दोन गावांच्या पाहणीनंतर धाराशिव जिल्ह्यातील करजखेडा आणि येरमाळा येथेही मुख्यमंत्री शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या भेटी दरम्यान शासनाकडून सुरू असलेल्या विविध उपाययोजनांची आखणी कशी करता येईल, यावरही चर्चा केली जाणार आहे. दरम्यान, दुष्काळग्रस्त भागातील उपाययोजना करण्यासाठी आता जिल्हा पातळीवर ‘वॉर रूम’ सुरू करण्याचा निर्णय घेतला जात आहे.
पालकमंत्र्यासह सुरू असलेल्या दौऱ्यामध्ये घटलेल्या उत्पादकतेची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात येत आहे. परिस्थिती गंभीर आहे. पंचनामे केवळ कायद्यात तरतूद आहे म्हणून करावे लागतात, पण त्यात न अडकता सरसकट मदत केली जाईल, असेही फडणवीस म्हणाले.
