छत्रपती संभाजीनगर : ‘ई-चलान’ प्रणालीच्या विरोधात खाजगी वाहतूकदार संघटना आक्रमक झाल्या असून ही कार्यपद्धती रद्द करण्याच्या मागणीसाठी उद्या राज्यव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये जिल्ह्यातील मोटार वाहक, ट्रक चालक, खाजगी बस चालक तसेच विविध वाहन चालक संघटना सहभागी होणार असल्याचा दावा केला जात आहे.

वाहतूकदार संघटनांच्या मते, ई-चलान प्रणालीमुळे चालकांवर आर्थिक ताण वाढत आहे. अनेक वेळा तांत्रिक त्रुटींमुळे चुकीचे चलान आकारले जाते. दंडाची रक्कम मोठी असल्याने छोट्या वाहनचालकांवर त्याचा गंभीर परिणाम होत असल्याचेही संघटनांचे म्हणणे आहे.

ई-चलान प्रणाली तात्काळ रद्द करावी किंवा त्यामध्ये आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी ठाम मागणी संघटनांकडून करण्यात आली आहे. उद्याच्या बंदमुळे मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः मालमोटारी व खाजगी बस सेवा बंद राहिल्यास व्यापारी व्यवहार आणि खासगी बसने प्रवास करणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या अनुषंगाने परिवहन आयुक्तांशी चर्चा झाल्या तरी कोणताही दिलासा मिळाला नसल्याने हा राज्य व्यापी बंद पुकारला असल्याचे सांगण्यात आले.