हिंगोली: तीन महिन्यानंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा भूगर्भातून गूढ आवाजासह भूकंपाचा धक्का बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदेसह परिसरातील अनेक गावांना बुधवारी सकाळी हादरा जाणवला. जिल्ह्यातील वसमत तालुक्यासह आसपासच्या भागात भूगर्भातून गूढ आवाज येत जमीन हादरण्याच्या घटना आत्तापर्यंत वारंवार घडल्या आहेत.
बुधवारी (२५ मार्च) सकाळी सुमारे ८.०९ वाजता पांगरा शिंदे, कुरुंदा, डोणवाडा, कोठारी, वापटी, कुपटी आणि शिरळी या गावांमध्ये अचानक मोठा आवाज होऊन जमीन हलल्याचा अनुभव नागरिकांनी घेतला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.४ इतकी नोंदविण्यात आली असल्याचे व उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी सांगितले आहे. तर प्रत्यक्षदर्शींनी हा धक्का पूर्वीच्या तुलनेत अधिक तीव्र असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, हिंगोली जिल्ह्यातील वसमत, औंढा नागनाथ आणि कळमनुरी या तालुक्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून भूगर्भातून आवाज येण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. २०२५ मध्येही अनक वेळा भूकंपाचे धक्के बसले होते, त्यापैकी काही मोठ्या घटनांची अधिकृत नोंद झाली होती.
गेल्या तीन महिन्यांपासून या भागात शांतता होती; मात्र बुधवारी झालेल्या घटनेने पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार होणाऱ्या या घटनांनंतरही महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. भूगर्भातून येणाऱ्या आवाजांचे नेमके कारण काय, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.
या पार्श्वभूमीवर भूगर्भशास्त्रज्ञांकडून सखोल अभ्यास व पाहणी करणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे. हा भाग भूकंपाच्या दृष्टीने अधिक संवेदनशील होत आहे का, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. प्रशासनाने तातडीने वैज्ञानिक तपासणी करून नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
बुधवारी सकाळी पांगरा शिंदेसह परिसरातील गावांमध्ये भूगर्भातून आवाज होऊन ३.४ रिश्टर स्केलचा धक्का नोंदविण्यात आला. घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. वारंवार घडणाऱ्या या प्रकारांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठातील भूगर्भ शास्त्रज्ञाची नेमणूक करण्यात येणार असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येईल, अशी माहिती वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली आहे.
