|| बिपीन देशपांडे

बदलत्या हवामानाचा परिणाम : गहू, ज्वारी, तांदळाला किडीचा धोका वाढल्याने खरेदी मंदावली

औरंगाबाद : दिवसा कडक ऊन आणि रात्री कडाक्याची थंडी, असे सध्याचे हवामान धान्यावर परिणाम करत असून त्याचे पडसाद बाजारपेठेतील खरेदी-विक्रीवरही होताना दिसत आहेत. धान्याची खरेदी कमालीची मंदावली आहे. एक व्यापारी जिथे २५ ते ३० टनापर्यंत धान्याची खरेदी करायचे तिथे ते चार ते पाच टनच गहू, ज्वारी, तांदूळ, असा मिळून एकत्रितरीत्या माल घेत आहेत. यातून होणारे लाखो रुपयांचे व्यवहारही थांबले आहेत.

शेतकऱ्यांकडील माल शेतीतून काढल्यानंतर तत्काळ बाजारात दाखल होतो. मळणी यंत्रातून काढलेल्या धान्याला कडक ऊन देणे अपेक्षित असते. पूर्वी ते दिले जायचे. मात्र, आता तसे न होता माल थेट बाजारात दाखल होतो. तेथे व्यापाऱ्यांकडून चाळणी होते आणि धान्य पोत्यात भरले जाते. त्यामुळे मालाला कीड लागण्याचा धोका अधिक असतो. सध्याचे वातावरणही कीड लागण्याची शक्यता असलेल्या काळाला एक प्रकारे पोषकच ठरणारे असून त्याचा परिणाम बाजारपेठेतील धान्य मालाच्या खरेदीवर होत आहे.

जाधववाडी उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीतील गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ व डाळीचे ठोक खरेदी-विक्रेते मंगेश कासलीवाल यांनी सांगितले की, सध्या गव्हाला चांगला दर मिळत आहे. मात्र, गव्हासह तांदूळ, बाजरी, ज्वारीला कडक ऊन देण्याची गरज भासते आहे. तसे न केल्यास धान्य किडण्याचा अधिक धोका असतो. अलीकडच्या काळात शेतातून मळणी यंत्रातून काढलेला माल थेट बाजारात दाखल होतो आणि येथे त्याची पोते-गोण्यांमध्ये भरणी होते. सध्या कडक ऊन आणि जवळपास तेवढ्याच प्रमाणात थंडीही पडत आहे. साधारणपणे हिवाळ्याच्या तोंडावर असेच वातावरण असते. मात्र, यंदाचे वातावरण अधिक बदलल्याचे जाणवते. त्याचा परिणाम धान्यावर होत असल्याने मोठ्या प्रमाणात साठवणूक केली जात नाही. कीड लागण्याच्या शक्यतेने सेल्फॉससारख्या धान्यामध्ये वायू सुटला जाणाऱ्या औषधांचा खपही वाढलेला आहे, असे कृषी सेवा केंद्राचे व्यापारी धन्नोसेठ गंगवाल यांनी सांगितले. ग्रामीण भागात धान्यांमध्ये लिंबाचा पाला कीड लागू नये म्हणून टाकला जातो. काही औषधीयुक्त गोळ्याही टाकल्या जातात.

व्यापारी साधारणपणे २५ ते ३० टन धान्य खरेदी करतो. त्यातून सात ते आठ लाखांचा व्यवहार होतो. मोठे व्यापारी १०० टनापर्यंतचा माल खरेदी करून साठवतात. मात्र, सध्या कीड लागण्याच्या शक्यतेने व्यापाऱ्यांकडून चार ते पाच टनच धान्य खरेदी केली जाते. आठ दिवसांत तेवढे धान्य विक्री करण्यावर भर दिला जातो. अन्यथा कीड लागून व्यापाऱ्यालाच पुन्हा चाळणी, वाळवणे करावे लागते. त्याचा खर्च अधिकचा पडतो. – मंगेश कासलीवाल, धान्याचे ठोक व्यापारी, जाधववाडी

लिंबाच्या पानांमध्ये बुरशी, कीडरोधक तत्त्व असल्यामुळे आपल्याकडे पुराण काळापासून त्याचा वापर धान्याला अधिक काळ टिकवण्यासाठी केला जातो. – प्रा. डॉ. जयप्रकाश पटवारी, वनस्पतीशास्त्र विभाग, उदगीर