|| सुहास सरदेशमुख

६० हजारांहून अधिक मुलांचे स्थलांतर

औरंगाबाद : राज्यात या वर्षी ११२ लाख टन साखर उत्पादित होईल, असा अंदाज आहे. विक्रमी ऊस उत्पादनामुळे १९३ कारखाने सुरू होतील. पण या साखर कारखान्यांना लागणारी ऊसतोड करणारे सव्वासहा ते साडेसहा लाख कामगार राज्यातील विविध कारखान्यांकडे रवाना झाले आहेत आणि त्यांच्याबरोबर ६० हजारांहून अधिक मुलेही स्थलांतरित झाली आहेत. दोन वर्षांपासून अध्ययनाची पाटी कोरी असणाऱ्या या मुलांच्या भवितव्याबाबत अद्याप सरकारला जाग आलेली नाही.

समाजकल्याण विभागामार्फत या वर्षीपासून कामगारांची नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पण नोंदणीबाबत फारशी जागरूकता नसल्याने २४ ते २५ हजार मजुरांचीच नोंदणी बीड जिल्ह्यात झाली आहे. एका कामगाराबरोबर दोन मुले असा ढोबळ अंदाज लावला तरी ६० हजार मुले सध्या साखर कारखान्याच्या परिसरात शिक्षणाविना फिरत आहेत. करोनामुळे दोन वर्षांपासून विद्याथ्र्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. ऑनलाइन पद्धतीने शिक्षण दिले असा सरकारचा दावा असला तरी अनेक गावांमध्ये रेंज नसल्यामुळे शिकणे- शिकवण्याची प्रक्रिया होऊ शकली नाही. परिणामी या विद्याथ्र्यांना किती अध्ययन क्षमता प्राप्त आहे, याची माहिती शिक्षकांना नाही. अलीकडेच विद्यार्थी संख्या किती स्थलांतरित झाली याबाबतचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. दिवाळीनंतर ही माहिती उपलब्ध होऊ शकेल आणि त्यानंतर ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी हंगामी वसतिगृहे सुरू करता येतील का, याची चाचपणी होऊ शकेल, असे सांगण्यात येत आहे. सरकारी पातळीवर शाळेपासून वंचित राहिलेल्या या मुलांसाठी पर्यायी शिक्षणाची कोणतीही सोय नाही. साखर कारखान्याच्या भोवती साखरशाळा असाव्यात, असे आदेश पूर्वी कधीतरी देण्यात आले होते. त्याचे कोणीही पालन करत नाही. हंगामी वसतिगृहातील त्रुटींमुळे ऊसतोड कामगार त्यांच्या मुलांना कामाच्या ठिकाणी बरोबर घेऊन जातात. त्यामुळे हजारो मुलांचा शिक्षणाचा प्रश्न या वर्षी अधिक गंभीर बनणार आहे. या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी स्वतंत्रपणे तरतूद करण्याची आवश्यकता आहे. पण तसे होताना दिसत नाही. परिणामी साखरेच्या विक्रमी हंगामातील शिक्षणाची दुरवस्था करोनाइतकीच भीषण असण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे शिक्षण व्यवस्थेचे चाक रुतलेले होते. ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली शहरी भागातील विद्याथ्र्यांना थोडेबहुत शिकविले गेले. पण ग्रामीण भागातील मुलांची पाटी कोरीच होती. या वर्षीची गळीत हंगाम विक्रमी असल्यामुळे ऊसतोड कामगारांना बरेच काम आहे. त्यामुळे पालकांबरोबर मुलांचे स्थलांतरही मोठ्या प्रमाणावर झाले आहे. या मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न गंभीर आहेत. -दीपक नागरगोजे, शांतीवन स्वयंसेवी संस्था (बीड जिल्हा)

हंगामी वसतिगृह सुरू करण्याबाबत जिल्ह्यात सर्वेक्षण करणे सुरू आहे. काही तालुक्यांची आकडेवारी आली आहे. काही येणे बाकी आहे. दिवाळीनंतर या मुलांच्या शिक्षणाची सोय करण्यासाठीच्या प्रक्रिया हाती घेतल्या जातील. -श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी, बीड