औरंगाबाद: शिवसेनेतील राजकीय बंडाळीला मराठवाडय़ातून मोठय़ा प्रमाणात साथ मिळाली असल्याचे चित्र दिसून येत आहे. मराठवाडय़ातील १२ आमदारांपैकी आठ आमदार एकनाथ शिंदे यांच्या बरोबर सुरत येथे असल्याने संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत. यामध्ये कॅबिनेटमंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

औरंगाबाद जिल्ह्यातून पैठण येथील संदीपान भुमरे, सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार, औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाठ, औरंगाबाद मध्यचे आमदार प्रदीप जैस्वाल, वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे हे पाच आमदार एकनाथ शिंदे यांच्या समवेत गेले.  औरंगाबाद जिल्ह्यातील सहा पैकी केवळ कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत हे एकमेव जिल्ह्यातील आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या वर्षां बंगल्यावरील बैठकीस हजर होते. सरकारस्थापनेपासून शिवसेनेवर नाराज असणारे भूम-परंडय़ाचे तानाजी सावंत यांचे भाजप नेत्यांबरोबर सूत जुळले होतेच. त्यांच्याबरोबर उमरगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौघुले हेही शिंदे यांच्याबरोबर गेले आहेत. उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील, हिंगोलीचे आमदार संतोष बांगर, राहुल पाटील हे मात्र उद्धव ठाकरे  यांनी बोलावलेल्या बैठकीस हजर होते.

नांदेडचे बालाजी कल्याणकर हेही सुरत येथे असून त्यांचा दूरध्वनीही दिवसभर बंद होता. बीड, लातूर व जालना या तिन्ही जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नाही. मराठवाडय़ातील केवळ चार आमदार शिवसेना पक्षप्रमुखांच्या बैठकीस उपस्थित होते.

चंद्रकांत खरे यांची शंका!

औरंगाबाद जिल्ह्यातील हे आमदार शिंदे यांच्याबरोबर जाण्यापूर्वी मंत्री संदीपान भुमरे यांच्या घरी जेवणासाठी आले होते. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हेही या वेळी त्यांच्यासमवेत होते. या घटनेबाबत बोलताना शिवसेना नेते खैरे म्हणाले,‘ रात्री संदीपान भुमरे यांच्या घरी आम्ही सारे होतो. तेथे आम्ही साऱ्यांनी जेवण घेतले. तेथे राज्यमंत्री अब्दुल सत्तार आले. ते पलिकडेच्या खोलीत गेले. त्यांचे आपसात काय बोलणे झाले माहीत नाही. जेवायचे मी थांबलो आहे, आता चला असे म्हटल्यावर सारे आले. तेव्हा सुरू असणाऱ्या कुजबुजीवरून काही तरी घडते आहे, याची शंका आली होती. पण हे असे सारे असेल असे वाटले नाही.’

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eight out of 12 mlas from marathwada with eknath shinde zws
First published on: 22-06-2022 at 01:57 IST