लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजे १ ते ७ जून दरम्यान मराठवाड्यातील आठ जणांचा मृत्यू झाला. त्यातील सहा जणांचा वीज पडून तर दोघांचा वाहून गेल्याने मृत्यू झाला. त्यांत एकट्या लातूर जिल्ह्यातील चौघांचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षांत वीज पडून सुमारे दीडशे व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

सहा जणांचा वीज पडून तर दोघांचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीत ११३ लहान आणि मोठी जनावरेदेखील दगावली आहेत. लातुरातील भाऊराव वाकसे (७०), शंकर सारगे (४२), बळीराम मुसळे हे वीज पडून, तर सविता फडके या पुरात वाहून गेल्याची घटना घडली आहे. याशिवाय संदीप राठोड (२५, जालना), शीतल चौधरी (धाराशिव), शंकर धर्मकार (३०, नांदेड) यांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. याशिवाय भगवान कदम (७०, नांदेड) यांचा गोठा पडून मृत्यू झाला आहे. मान्सून व वळवाच्या पावसात ११३ जनावरांचा मृत्यू झाला असून, १०७ घरांची अंशत: पडझड झाल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

हेही वाचा >>>दानवेंचे काम न केल्याची सत्तार यांची कबुली

सन २०२१ ते २०२३ या कालावधीत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत १४९ जणांचा मृत्यू हा वीज पडून झाला होता. वीज अटकाव यंत्रणेचा अभाव असल्याचे लक्षात आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक जिल्ह्यात किमान १०० वीज अटकाव यंत्रे उभारण्याचे निर्देश अलीकडेच प्रशासनाला दिले होते.सध्या मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत ४०७ वीज अटकाव यंत्रे आहेत. ज्यातील १५ यंत्रे सध्या बंद अवस्थेत आहेत.